
मुंबई (Mumbai) मधील अंधेरी (Andheri) येथे ऑटो रिक्षा (Auto Rickshaw) चोरी करणाऱ्या टोळीला गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे. या टोळीने एकूण 40 रिक्षा चोरल्या असून त्याची किंमत तब्बल 75 लाख 80 हजार इतकी आहे. ही टोळी रिक्षा चोरुन वसईतील एका गॅरेजमध्ये तिचा रजिस्टर नंबर, इंजिन नंबर, चेसिस नंबर बदलून पुन्हा मुंबईत आणून त्या रिक्षा भाड्याने देत असत. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी मुन्नातीयाज शेख (61) आणि खुशनुयार मुख्तार शेख (37) यांना कुर्ल्यातून अटक केली आहे. मात्र इतर आरोपींचा शोध अद्याप सुरु आहे. ABP माझाने या संदर्भातील वृत्त दिले आहे.
अंधेरी येथील एका रिक्षा चालकाने रिक्षा चोरीची तक्रार दाखल केल्यानंतर या टोळीचा पर्दाफाश झाला. 13 मार्च रोजी अंधेरी कुर्ला रोडवर या रिक्षाचालकाने रिक्षा उभी केली आणि तो घरी गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी रिक्षा चालवण्यासाठी गेले असता रिक्षा जागेवर नव्हती. त्याने आजूबाजूला शोध घेतला. मात्र तरीही रिक्षा न सापडल्याने त्याने अंधेरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. (पुणे: फक्त रिक्षाचालकांंचे मोबाईल चोरायचा भुरटा चोर, पोलिसांनी अटक करताच दिलं 'हे' विचित्र कारण)
त्यानंतर पोलिसांनी रिक्षाचा शोध घेण्यासाठी एक पथक तयार केलं. सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं फूटेज आणि इतर तांत्रिक बाजू तपासल्यानंतर एक रिक्षा संशयितरित्या फिरत असल्याचे पथकाच्या निर्दशनास आले. पोलिसांनी सापळा रचत त्या रिक्षा चालकाला अटक केली. त्यानंतर या सर्व प्रकार उघडकीस आला. दरम्यान, पोलिसांनी वसईतील गॅरेजमधून गॅस कटर, सिलेंडरसह इतर साहित्य जप्त केलं आहे.