Mumbai ATS: तब्बल 21 कोटी रुपयांचे Uranium जप्त, दोघांना अटक; मुंबई एटीएस पथकाची कारवाई
Uranium | Representational Image (Photo Credits: pixabay)

लॉकडाऊन काळात मुंबईतून एक धक्कादायक बातमी आली आहे. मुंबई एटीएस (Mumbai ATS) पथकाने दोघांना अटक केली आहे. या दोघांकडून तब्बल 7.10 किलोग्राम रेडियोधर्मी प्राकृतिक यूरेनियम (Uranium) जप्त केले आहे. बाजारात या युरोनियमची किंमत सुमारे 21.30 कोटी रुपये इतकी असल्याचे सांगण्यात येत आहे. एटीएच पथकाने गुरुवारी ही कारवाई केली. दरम्यान, या दोन व्यक्तींनी इतक्या मोठ्या प्रमाणावर युरेनियम आणले कोठून आणि त्याचा पुरवठा ते कोणाला करणार होते, याबाबत पोलीस तपास करत आहेत. परंतू, इतक्या मोठ्या प्रमाणावर युरेनियम सापडल्याने तर्कवितर्क व्यक्त होत आहेत.

वृत्तसंस्था आयएएनएसने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबई एटीएसच्या नागपाडा पथकाने या दोघांवरकारवाई केली. जप्त केलेले युरेनियम भाभा औष्णिक अनुउर्जा केंद्राला पाठविण्यात आले आहे. भाभा अष्णिक केंद्राकडून या युरेनियमची गुणवत्ता, त्याची शक्ती आणि इतर बाबींबात कारवाई केली जाणार आहे. दरम्यान, हे युरेनियम अधिक घातक प्रकारात मोडत असल्याची प्राथमिक माहिती आहे. बाजारात या युरेनियमची किंमत 21.30 कोटी इतकी असल्याचे समजते. पोलिसांनी युरेनियमची बेकायदेशीर रित्या वाहतूक करणे आणि जवळ बाळगणाऱ्या दोघांवर परमाणु ऊर्जा अधिनियम, 1962 आणि इतर काही कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा तपास अद्यापही सुरु आहे. (हेही वाचा, Fact Check: सोनभद्र येथे खरंच सापडली 3000 टन सोन्याची खाण? GSI ने केलेला हा खुलासा सांगतोय काहीतरी वेगळंच)

एटीएस अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, हे यूरेनियम (Uranium) जर चुकीच्या हाती गेले असते तर त्याचा दुरुपयोग झाला असता. इतकेच नव्हे तर त्याचा वापर स्फोटक बनविण्यासाठीही केला जातो. आरोपींनी एका खासगी लॅबमध्येही युरेनियमची तपासणी करुन त्याची गुणवत्ता तपासल्याची माहिती आहे. त्यामुळे एका अज्ञात लॅबनेही आरोपींना अप्रत्यक्ष मदत केल्याचा संशय आहे. महाराष्ट्र एटीएस त्या संशयीत लॅबचा शोध घेत आहे. युरेनियम हा अत्यंत स्फोटक आणि संवेदनशील पदार्थ मानला जातो. साधारण 1 किलो युरोनियमची किंमत तब्बल 3 कोटी रुपये इतकी सांगितली जाते.