मुंबईतील आर्थर रोड जेलमधील 77 कैदी आणि 26 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण- अनिल देशमुख
Home Minister Anil Deshmukh | (Photo Credits: Facebook Live Screenshot)

देशभरासह महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढत चालला आहे. त्यामुळे सरकारकडून कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. वैद्यकिय कर्मचाऱ्यांकडून कोरोनाग्रस्त रुग्णांवर दिवसरात्र उपचार करण्यात येत आहे. सध्या कोरोनासंबंधित कोणतेच ठोस औषध उपलब्ध नाही आहे. तरीही कोविड वॉरियर्स याचा यशस्वीपणे सामना करत आहेत. याच दरम्यान मुंबईतील आर्थर रोड जेलमधील 77 कैदी आणि 26 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. आर्थर रोड जेलसह 8  तुरुंग पूर्णपणे सध्या बंद ठेवण्यात आले असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.

तुरुंगामध्ये सध्या कोणालाही आत किंवा बाहेर जाण्यास परवानगी नाही आहे. मात्र भाजी किंवा दुध पुरवठा करणाऱ्या व्यक्तींच्या माध्यमातून कोरोनाचे संक्रमण झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. आतापर्यंत आर्थर रोड जेलमधील 77 कैद्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर गुरुवारी आर्थर रोड जेलमधील एकूण 72 कैदी आणि 7 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. या कैद्यांना आज जीटी रुग्णालय आणि सेंट जॉर्ज हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात येत होते.

दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 18 हजारांच्या पार गेला आहे. नागरिकांना वारंवार घरात थांबण्याचे आवाहन करण्यात येत असून ही त्यांच्याकडून नियमांचे उल्लंघन केले जात आहे. अद्याप ही सरकारने विविध राज्यातील जिल्ह्यांच्या सीमा बंद केल्या आहेत. तर लॉकडाउनमुळे अडकलेल्या स्थलांतरित कामगार आणि मजूर वर्गाला त्यांच्या घरी पाठवण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत.