मुंबई मध्ये रेल्वे मार्गावर येणाऱ्या मुंब्रा भागात झालेल्या भीषण रेल्वे अपघातात चार प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर असे प्रकार टाळण्यासाठी विचारमंथन सुरु आहे. दरम्यान, या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या घटनेला संबोधित करताना मुंबईच्या उपनगरीय रेल्वे नेटवर्कमध्ये सुरक्षा वाढवण्याचे ठाम आश्वासन दिले. त्यांनी स्वयंचलित दरवाजे आणि चांगले वायुवीजन असलेल्या अधिक वातानुकुलीत लोकल (Mumbai AC Local Trains) सुरू करण्याची योजना जाहीर केली. याच वेळी मुंबईतील जवळपास सर्व लोकल एसी केल्या तरी प्रवाशांना त्याचा भार सहन करवा लागणार नाही. कारण नियमीत भाड्यांमध्ये वाढ केली जाणार नसल्याचे ते म्हणाले.

मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रतिक्रिया

मुंबईतील मुंब्रा परिसरात दोन विरुद्ध दिशेने धावणाऱ्या लोकल ट्रेनमधून पडून चार प्रवाशांचा मृत्यू झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना मुंबईसाठी अधिक AC लोकल्स आणण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या लोकल्समध्ये स्वयंचलित दरवाजे आणि योग्य वायुवीजन यंत्रणा असणार असून सध्याच्या तिकीट दरात कोणताही बदल केला जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.  (हेही वाचा, Pune Railway Division: मुंबईतील दुर्घटनेनंतर पुणे रेल्वे विभागाचा धक्कादायक अहवाल; 18 महिन्यांत 158 प्रवासी गाडीतून पडले, 49 जणांचा मृत्यू)

दुर्घटना गंभीर आणि धक्कादायक – मुख्यमंत्री

“ही घटना गंभीर असून अत्यंत धक्कादायक आहे,” असे फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. सोमवारी ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथे झालेल्या या अपघातानंतर मंगळवारी त्यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी सुमारे 45 मिनिटे चर्चा केली. या अपघातात चार प्रवाशांचा मृत्यू झाला असून नऊ जण जखमी झाले आहेत. यातील दोन जणांची प्रकृती चिंताजनक आहे. (हेही वाचा: Mumbai Train Accident: मुंबई लोकल ट्रेन अपघातानंतर रेल्वे बोर्डाचा मोठा निर्णय; डब्यांमध्ये बसवले जाणार स्वयंचलित दरवाजे)

प्रवासी सोयी आणि सुरक्षेवर भर

मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, “आगामी काळात प्रवाशांसाठी सुविधा आणि सुरक्षितता वाढवली जाणार आहे. मुंबईच्या उपनगरी रेल्वे प्रणालीवर मोठा भार आहे. तो सर्व मेट्रो लाईन्स पूर्ण होईपर्यंत कायम राहणार आहे.” स्वयंचलित दरवाज्यांसोबत योग्य वायुवीजन यंत्रणेचीही आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर, “आम्ही सध्या अस्तित्वात असलेल्या तिकीट दरांमध्ये कोणताही बदल न करता अधिक AC लोकल्स आणण्याचा विचार करत आहोत,” असेही फडणवीस म्हणाले.

सार्वजनिक वाहतूक विकास सरकारच्या अजेंड्यावर

फडणवीस यांनी हेही सांगितले की केंद्र आणि राज्य सरकार दोघांसाठीही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारणा हे सर्वोच्च प्राधान्य आहे. या दिशेने आवश्यक त्या सर्व सुधारणा करण्यात येत आहेत.

मुंबईसाठी स्वतंत्र रेल्वे महामंडळाची मागणी – राज ठाकरे

दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईच्या उपनगरी रेल्वे सेवा स्वतंत्र महामंडळाकडून चालवण्याची मागणी पुन्हा एकदा उपस्थित केली. “ही मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. मी स्वतःदेखील ही मागणी केली होती, मात्र आजपर्यंत कोणत्याही सरकारने याकडे लक्ष दिलेले नाही,” असे त्यांनी सांगितले.

शहर नियोजन कोलमडले – ठाकरे

“आज शहरांचे नियोजन पूर्णतः कोलमडले आहे. लोकसंख्या वाढत आहे. त्यांच्या गरजांसाठी मोठमोठ्या रस्त्यांचे, पूलांचे आणि मेट्रो प्रकल्पांचे काम सुरू आहे. उंच इमारती बांधण्यास परवानगी दिली जाते, पण पार्किंगसाठी कोणतीही योजना नाही,” अशी टीका त्यांनी केली.

राज ठाकरे यांनी असेही सांगितले की, “आपले पूर्ण लक्ष फक्त निवडणुका आणि प्रचारावर केंद्रित झाले आहे. राज ठाकरे-उद्धव ठाकरे युती होणार का, या पेक्षा महत्त्वाचा प्रश्न असा आहे की, मुंबईत आज प्रवास कसा होतोय, लोक कसली झगडत आहेत.”

हा अपघात नव्हे, मानवी बळी – काँग्रेसची टीका

मुंबईतील अपघातावरून काँग्रेसने केंद्र आणि राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले की, “मुंबईतील प्रवाशांना कार्यालयात पोहोचण्यासाठी गर्दीच्या लोकलमधून लटकून प्रवास करावा लागतो, ही व्यवस्था स्वतःमध्येच एक शोकांतिका आहे. हे केवळ अपघात नसून भाजप सरकारने घेतलेला मानवी बळी आहे.”

बुलेट ट्रेन नव्हे, सुरक्षित लोकल सेवा हवी

“भाजप सरकार बुलेट ट्रेन प्रकल्प पूर्ण करण्यावर भर देत आहे. पण मुंबईकरांना बुलेट ट्रेन नकोय, त्यांना सुरक्षित आणि विश्वासार्ह लोकल सेवा हवी आहे. रेल्वे प्रशासन आणि सरकार सामान्य मुंबईकरांच्या जीवाशी खेळत आहे. आता हे थांबले पाहिजे,” अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली.