प्रतिकात्मक फोटो (Photo Credit: फाइल फोटो)

आई-मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना मुंबईमध्ये (Mumbai) घडली आहे. सोमवारी मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये एका 41 वर्षीय महिलेने बाळाला जन्म दिला. मात्र प्रसूतीनंतर तिने आपल्या मुलाला टॉयलेटच्या डस्टबिनमध्ये फेकून दिले. याप्रकरणी तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जेव्हा हाऊसकीपिंग कर्मचार्‍याने शौचालयात मुलाचा रडण्याचा आवाज ऐकला तेव्हा ही घटना सकाळी 10.30 वाजता उघडकीस आली,. बाळाचे वजन सुमारे 2.8 किलो आहे आणि त्याला नायर रुग्णालयाच्या नवजात अतिदक्षता विभागात (NICU) दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती स्थिर आहे.

प्राथमिक चौकशीत समोर आले की, महिला काही कामानिमित्त हॉटेलमध्ये आली होती, तिथे अचानक तिला प्रसूतिवेदना सुरु झाल्या. त्यानंतर तिने शौचालयात बाळाला जन्म दिला. ही महिला गोरेगाव (पूर्व) येथील रहिवासी असून, पतीसोबत असलेल्या वैयक्तिक वादातून तिने मुलाला सोडून दिले. मिळालेल्या माहितीनुसार, एनएम जोशी मार्ग पोलिसांनी सांगितले की, त्यांना सोमवारी सकाळी 10.40 च्या सुमारास मुख्य नियंत्रण कक्षाकडून मध्य मुंबईतील एका हॉटेलमध्ये काही मदतीची आवश्यकता असल्याचा फोन आला.

तेथे पोहोचल्यावर पोलिसांना माहिती मिळाली की, हाऊसकीपिंग कर्मचारी चैताली गावडे यांना हॉटेलच्या एका टॉयलेटच्या डस्टबिनमध्ये रक्ताने माखलेले नवजात अर्भक आढळले आहे. पोलिसांनी मुलाला तातडीने नायर रुग्णालयात नेले व तिथेडॉ क्टरांनी त्याला एनआयसीयूमध्ये दाखल केले. त्याच दिवशी सकाळी 8 ते 10 च्या दरम्यान मुलाचा जन्म झाल्याचे डॉक्टरांनी पोलिसांना सांगितले. (हेही वाचा: Murder: आर्थिक त्रासाला कंटाळून सात वर्षीय पोटच्या मुलीला पाजले विष, चिमुकलीचा मृत्यू)

हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर पोलिसांना एक गर्भवती महिला दिसली. हॉटेल प्रशासनाकडे चौकशी केल्यावर, पोलिसांना कळले की ही महिला एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीची कर्मचारी आहे. दुसऱ्या दिवशी हॉटेलमध्ये ठरलेल्या कार्यक्रमासाठीची तयारी तपासण्यासाठी ती हॉटेलमध्ये आली होती. त्यानंतर पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्या महिलेवर भारतीय दंड संहिता कलम 317 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस लवकरच तिला आणि पतीला चौकशीसाठी बोलावू शकतात.