Mumbai: काय सांगता? वाढदिवसादिवशी पठ्ठ्याने कापले तब्बल 550 केक; Viral Video समोर आल्यानंतर होत आहे कारवाईची मागणी
वाढदिवसादिवशी कापले 550 केक (संग्रहित संपादित प्रतिमा)

बरेच लोक त्यांचा वाढदिवस (Birthday) मोठ्या आनंदाने साजरा करतात. हा दिवस चांगल्या प्रकारे आणि संस्मरणीय बनवण्यासाठी लोक खूप काही करतात. पण मुंबईतील (Mumbai) एका व्यक्तीने त्याच्या वाढदिवशी असे काही केले जे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. या व्यक्तीने एकाच वेळी 550 केक (Cake) कापून आपला वाढदिवस साजरा केला. या व्यतिरिक्त, वाढदिवसामध्ये सामील झालेल्या लोकांनी कोरोनाच्या अनेक नियमांचे उल्लंघन केले. मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण मुंबईच्या कांदिवली पश्चिम स्टेशन परिसरातील आहे.

सूर्य रतुरी असे एकाच वेळी 550 केक कापणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. गेल्या मंगळवारी सूर्याचा वाढदिवस होता. या दरम्यान त्याने 550 केक्सची ऑर्डर दिली. स्वतःचा वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यासाठी त्याने हे सर्व केक एकत्र कापले. सूर्याच्या वाढदिवसाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये 3 मोठ्या टेबलांवर 550 रंगीबेरंगी केक सजवण्यात आले असल्याचे दिसत आहे. त्यानंतर सूर्या दोन्ही हातांमध्ये चाकू घेऊन हे सर्व केक कापत असताना दिसत आहे. या दरम्यान तेथे उपस्थित लोकही त्याला ओरडून प्रोत्साहन देताना दिसत आहेत. वाढदिवसामध्ये सामील झालेल्या बहुतेक लोकांनी मास्कही घातले नसल्याचे दिसत आहे. यासह, संपूर्ण वाढदिवसाच्या पार्टीमध्ये सामाजिक अंतराचा नियमदेखील पायदळी तुडवल्याचे दिसत आहे. (हेही वाचा: Viral Videos: प्रियकर प्रेयसीच्या प्रपोजमध्ये कुत्र्याचा अडथळा; मध्येच थांबववावा लागला कार्यक्रम)

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर स्थानिक लोकांनी या प्रकरणी मुंबई पोलिस आणि बीएमसीकडे कारवाईची मागणी केली आहे. महाराष्ट्रात कोविड प्रोटोकॉल अंतर्गत सामाजिक कार्यक्रमांवर बंदी घातली गेली आहे. दुसरीकडे कर्नाटकमधील आमदार बसवराज दादेसुगूर यांचा मुलगा सुरेश याने चक्क आयफोनने केक कापून आपला वाढदिवस साजरा केला आहे. सध्या याचाही व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.