मुंबईमध्ये (Mumbai) लस (Vaccine) न घेणाऱ्या लोकांसाठी कोरोना विषाणू (Coronavirus) एक काळ बनून आला आहे. ज्यांनी लस घेतली नाही अशा अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे, हा धक्कादायक खुलासा मुंबई महापालिकेने (BMC) केला आहे. बीएमसीने दिलेल्या माहितीनुसार, 11 महिन्यांत कोविडमुळे 4 हजार 575 लोकांचा मृत्यू झाला, यापैकी 94 टक्के असे लोक होते ज्यांनी कोविडविरोधी लस घेतली नव्हती. अकरा महिन्यांत कोविडमुळे समोर आलेल्या मृत्यूंपैकी 4,320 जणांनी लस घेतली नव्हती.
बीएमसीने दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी 2021 ते जानेवारी 2022 या कालावधीत मुंबई उपनगरी भागात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांपैकी बहुतेकांनी लसीचा एकही डोस घेतला नाही. मृत्यूमुखी पडलेल्यांपैकी केवळ 6 टक्के लोकांचे संपूर्ण लसीकरण झाले होते. बीएमसीने उघड केलेली ही आकडेवारी लसीकरण न केल्यास घातक परिणामाचा सर्वात मोठा पुरावा आहे.
लसीकरणाबाबत विविध विभागातील लोकांना जागरूक करण्यासाठी बीएमसी आपापल्या परीने सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, तरीही मोठ्या संख्येने लोक लस घेण्यास पुढे येत नाहीत, असे दिसून येते. 16 जानेवारी रोजी अँटी-कोरोनाव्हायरस लसीकरण मोहिमेला एक वर्ष पूर्ण होणार आहे. या एका वर्षात समोर आलेली गोष्ट म्हणजे कोरोनाच्या तिसर्या लाटेत संसर्गाची तीव्रता वाढत असतानाही फार कमी लोक रुग्णालयात दाखल होत आहेत. (हेही वाचा: सुरु झाली Covid-19 ची तिसरी लाट, जानेवारी-अखेरपर्यंत पोहोचेल पीकवर; मंत्री Rajesh Tope यांची माहिती)
कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्या तुलनेत तिसऱ्या लाटेतील मृतांची संख्या खूपच कमी झाली आहे. विशेषत: इतर गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या मृत्यूच्या संख्येतही झपाट्याने घट झाली आहे. तज्ज्ञांनी याचे महत्त्वाचे कारण लसीकरण असल्याचे सांगितले आहे. बीएमसी कमिशनर इक्बाल सिंग चहल यांनी तीन दिवसांपूर्वी माहिती दिली होती की, ऑक्सिजन सपोर्टवर असलेले 96 टक्के रुग्ण हे लसीकरण झालेले नाहीत.