मुंबईतील (Mumbai) वांद्रे (पश्चिम) येथील एका 83 वर्षीय व्यावसायिकाला पॉर्न साइट्स (XXX Site) पाहणे महागात पडले. पॉर्न साइट्स पाहण्याच्या नादात या वृद्ध व्यवसायिकाची 32 हजार रुपयांची फसवणूक झाली. वांद्रे पोलिसांनी मंगळवारी याप्रकरणी एफआयआर नोंदवला आहे. पीडित वृद्धाचा आयात-निर्यातीचा व्यवसाय आहे. त्याने काही कारणास्तव नुकतीच एका पॉर्न साइटला भेट दिली. या दरम्यान त्याची फसवणूक झाली.
पॉर्न वेबसाईटला भेट दिल्यानंतर त्याच्या स्क्रीनवर एक संदेश आला की तो एका पॉर्न साइटवर जात आहे आणि त्यानंतर त्याचा संगणक ब्लॉक झाला. नंतर त्याला संदेश आला की पुढील 24 तासांत 29 हजार रुपये न भरल्यास अटक करण्यात येईल. धक्कादायक म्हणजे हा संदेश पोलिस चिन्हासह लिहिण्यात आला होता. त्यामुळे वृद्ध अस्वस्थ झाला घाबरुन गेला.
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना 29 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजताच्या सुमारास घडली. जेव्हा सदर व्यवसायिक व्यक्तीने पॉर्न साइटला भेट दिली. ही व्यक्ती मुंबईतील वांद्रे बॅंडस्टँड येथे राहते. वांद्रे पोलिस स्टेशनच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, 'पीडित वृद्धाला फसवणूक झाल्याचे लक्षात आले जेव्हा तो बँकेत खाते विवरण तपासण्यासाठी गेला. तेथे त्याला हे पैसे कोणत्याही पोलिस खात्यात नसून MERD/PAYU GURGAON/3786 मध्ये असल्याचे आढळले. आम्ही ज्या खातेदारामध्ये पैसे जमा केले होते त्याचा तपशील मागवला आहे जेणेकरून या प्रकरणात अटक करता येईल.
आपल्या तक्रारीत व्यावसायिकाने म्हटले आहे की, 'पोर्न साइट पाहत असताना माझ्या संगणकाच्या स्क्रीनवर पोलिसांच्या चिंन्हासह संदेश दिसल्यानंतर मी पैसे दिले. संदेशात म्हटले होते की, - पॉर्न फिल्म पाहणे बेकायदेशीर आहे. तरीही तुम्ही पाहिल्यास त्यासाठी 5 लाख रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो. तुम्हाला एका दिवसात 29,000 रुपये भरावे लागतील, असे न केल्यास तुम्हाला अटक केली जाईल.'