कोरोना विषाणूमुळे (Covid-19) संपूर्ण देशात भयंकर परिस्थीती निर्माण झाली आहे. कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी सरकारकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. यातच दक्षिण मुंबई (South Mumbai) येथील पंचतारांकीत ताज महल पॅलेस हॉटेलमध्ये (Taj Mahal Palace Hotel) कोरोनाचे एकूण 6 रुग्ण आढळल्याने सर्वत्र भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे. या सर्व कोरोनाबाधीत रुग्णांना उपचारासाठी बॉम्बे रुग्णालयात (Bombay Hospital) दाखल करण्यात आले आहे. महापालिकेने खबरदारीचा शनिवारी ताज महल पॅलेस हॉटेलमधील 22 कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी केली होती. ताज हॉटेलचे व्यवस्थापन सांभाळत असलेल्या द इंडियन हॉटेल्स कंपनीने याबाबत एक निवेदन जारी केले आहे. ज्या कर्मचाऱ्यांचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तसेच ज्यांच्यात कोरोना सदृष्य लक्षणे आढळली आहेत, अशा सर्वांना तातडीने क्वारंटाइनमध्ये पाठवण्यात आले आहे. सरकारच्या स्थानिक यंत्रणांच्या सर्व सूचना पाळल्या जात आहेत, असे त्यात नमूद करण्यात आले आहे.
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषीत केले होते. दरम्यान, अत्यावश्यक सेवा वगळता सर्वकाही बंद ठेवण्यात आले आहेत. मात्र, या कठिण परिस्थितीत डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी आपला जीव धोक्यात टाकून नागरिकांची सेवा करत आहेत. दरम्यान, रतन टाटा यांनी मुंबईमधील ताज हॉटेलमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांच्या राहण्याची व्यवस्था केली होती. मात्र, आता ताज हॉटेलमध्ये कार्यरत असलेल्या 6 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे सर्वत्र मुंबई परिसरात भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे. हे देखील वाचा- राज्यातील स्वस्त धान्य दुकानांमधून 1 ते 11 एप्रिल दरम्यान 1 कोटी 16 लाख 84 हजार शिधापत्रिका धारकांना तब्बल 31 लाख 81 हजार क्विंटल अन्नधान्याचे वाटप - छगन भुजबळ
जगभरात कोरोनाबाधीतांची संख्या 16 लाख 91 हजार 719 वर पोहचली आहे. यांपैकी 1 लाख 2 हजार 525 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 3 लाख 68 हजार 669 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याची माहिती समोर आली आहे. भारतही आता कोरोना विषाणूच्या जाळ्यात अडकत चालला असल्याची चिन्ह दिसू लागली आहे. भारतात आतापर्यंत एकूण 7 हजार 529 कोरोना बाधीत आढळले आहेत. त्यांपैकी 242 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 642 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. भारतात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनाबाधीतांची संख्या 1761 वर पोहचली आहे. यात 127 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 208 रुग्ण कोरोना विषाणूच्या जाळ्यातून बाहेर आल्याचे समजत आहे.