आज घटस्थापनेचा मुहूर्त साधत महाराष्ट्र कॉंग्रेस पक्षाने 51 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. कॉंग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीने या 51 उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. मात्र आता ही यादी जाहीर होताच कॉंग्रेसमधील नाराजी समोर आली आहे. नेटवर्क 19 च्या रीपोर्ट्सनुसार, पहिल्या यादीमधून सहा विद्यमान आमदारांची नावं वगळण्यात आल्याने नाराज उमेदवार कॉंग्रेस पक्षाला रामराम करत उद्या भाजपा पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत. मुंबईमध्ये गरवारे क्लबमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये 6 कॉंग्रेस नेते भाजपामध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019: बाळासाहेब थोरात, प्रणिती शिंदे, अमित देशमुख यांच्यासह 51 कॉंग्रेस उमेदवारांची पहिली यादी जाहीर.
कॉंग्रेस पक्षाने विधानसभेसाठी उमेदवारी नाकारल्याने कॉंग्रेस पक्षाला अलविदा म्हणत भाजप पक्षामध्ये सुरू असलेल्या मेगा भरतीमध्ये सहभागी होणार आहेत. येत्या 21 ऑक्टोबरला महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकीसाठी मतदान होणार आहे. नाराज आमदारांमध्ये असलम शेख, राहुल बोंदे, काशिराम पावरा, डी.एस. अहिरे, सिद्धराम म्हेत्रे, भारत भालके यांचा समावेश आहे.
महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ 9 नोव्हेंबरला संपणार आहे. त्याआधी राज्यात निवडणूका होणं गरजेचे आहे. त्यासाठी राज्यात 21 ऑक्टोबरला मतदान आणि 24 ऑक्टोबरला निवडणूक निकाल आहे.