Mumbai: लग्नाच्या बहाण्याने मोठा व्यापारी असल्याचे भासवून 35-40 महिलांची लाखो रुपयांची फसवणूक; BTech-MBA तरुणाला कल्याण येथून अटक
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

मुंबईमध्ये (Mumbai) विवाहाच्या नावाखाली फसवणूक केल्याप्रकरणी शहर गुन्हे शाखेने एमबीए कम बीटेक पदवीधराला अटक केली आहे. आरोपी विशाल चव्हाण, 34 उर्फ अनुराग चव्हाण याने लग्नाच्या बहाण्याने 35-40 महिलांना मोठा व्यापारी असल्याचे भासवून फसवले आहे. एक महिन्यापासून आरोपीचा शोध सुरु होता, अखेर गुन्हे शाखेने त्याला कल्याण येथून अटक केली. याठिकाणी तो बाहेरून बंद असलेल्या हॉटेलच्या खोलीत लपला होता. गेल्या वर्षी चव्हाणने कांजूरमार्ग येथील एका 28 वर्षीय महिलेला लग्नाचे आमिष दाखवून 2.25 लाख रुपयांना फसवले होते.

एका विवाह जुळवणाऱ्या व्यासपीठावर या महिलेची आणि त्याची ओळख झाली. दोघांमध्ये ओळख वाढल्यावर गुंतवणुकीच्या नावाखाली त्याने तिला पैसे देण्यास भाग पाडले. महत्वाचे म्हणजे आरोपी कधीही या मुलीला वैयक्तिकरित्या भेटला नाही, असे पोलिसांनी सांगितले. आरोपीने बँकांना त्याचे खोटे तपशील दिले होते. तसेच विविध सोशल मीडिया आणि मॅट्रिमोनिअल अकाऊंट्सवरही त्याने नमूद केलेली माहिती खोटी होती. त्याच्या मोबाईल कॉल डेटा रेकॉर्ड विश्लेषण आणि SDR विश्लेषणामध्ये देखील त्याने चुकीचा पत्ता दिल्याचे आढळले. (हेही वाचा: Gay Sex Racket: मुंबईमध्ये पहिल्यांदाच मोठ्या 'गे सेक्स रॅकेट'चा पर्दाफाश; तरुण मुले पुरवण्याचे आश्वासन देत अनेकांना लुबाडले, तिघांना अटक)

त्याचे सोशल मीडिया अकाऊंट, त्याचे मोबाईल लोकेशन आणि त्याने वापरलेले वेगवेगळे अॅप्लिकेशन यांच्या आधारे गुन्हे शाखेला अखेर त्याचा माग काढण्यात यश आले. त्याला सोमवारी कल्याण येथील श्रद्धा महल हॉटेलमधून अटक करण्यात आली असून तो बाहेरून बंद असलेल्या खोलीत राहत होता. डिलिव्हरी बॉय म्हणून गुन्हे शाखेने खोलीत प्रवेश केला आणि त्याला अटक केली.

त्यानंतरच्या तपासात, चव्हाण फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप, मॅट्रिमोनिअल साइट्स आणि इतर सोशल मीडिया अॅप्सवर महिलांशी मैत्री करत असे. आपण एक श्रीमंत व्यापारी असल्याचे भासवून लग्नाच्या बहाण्याने त्याने अनेक महिलांची फसवणूक केली असल्याचे निष्पन्न झाले. गेल्या काही वर्षांत, त्याने 35-40 महिलांची 15-20 लाख रुपयांची फसवणूक केली होती, तर नवीन आयफोन स्वस्तात विकण्याच्या बहाण्याने 25-30 लोकांची 20-30 लाख रुपयांची फसवणूक केली होती. त्याच्याविरुद्ध वर्सोवा आणि सायन पोलीस ठाण्यात अनुक्रमे बलात्काराचा आणि खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, तसेच इतर अनेक फसवणुकीचे गुन्हेही दाखल होते.