पनवेल: तळोजा मध्यवर्ती कारागृहात एका कैद्याची गळफास लावून आत्महत्या
(Photo courtesy: archived, edited images)

पनवेल येथील तळोजा मध्यवर्ती कारागृहात (Taloja Central Jail) एका कैद्याची गळफास (Hanging) लावून आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना आज पहाटे 5 च्या सुमारास घडली आहे. या बातमीने कारागृहातील कैद्यांसोबाबत अधिकाऱ्यांमध्येही खळबळ उडाली आहे. मृतावर 4 ते 5 गुन्हे दाखल असून गेल्यावर्षी त्याला जेलमधून तळोजा कारागृहास हलवण्यात आले होते. सध्या तो कलम 302 आणि 354 अंतर्गत शिक्षा भोगत होता. मात्र, आज त्याने कारागृहातील शौचालयाच्या खिडकीला चादर अडकवून गळफास घेतला आहे. या कैद्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जे जे रुग्णालयात नेण्यात येणार आहे, अशी माहिती इंडियन एक्स्पेसने दिली आहे. या घटनेने संपूर्ण पोलीस प्रशासनात चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे.

बालू गडसिंगे असे आत्महत्या करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. त्याने पहाटे 5 च्या दरम्यान आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. गडसिंगे याच्यावर 4 ते 5 गुन्हे दाखल असून तो न्यायबंदी होता. त्याच्यावर माजलगाव, शिवाजी नगर अशा ठिकाणी सुद्धा गुन्हे दाखल होते. यामुळे तो  2017 पासून शिक्षा भोगत होता. बालू गडसिंगे हा गेल्यावर्षी कल्याण जेलमधून तळोजा जेलमध्ये शिफ्ट करण्यात आले होते. मात्र, तो आल्यापासून स्वभावाने रागीट असल्यामुळे त्याचे इतर कैद्यांसोबत पटत नव्हते. इतरांशी पटत नसल्यामुळे त्याला कारागृहातील विशेष कक्षात ठेवण्यात आले होते. यावेळी त्याने कैद्यांना देण्यात येणाऱ्या चादरीने बंदिस्त असलेल्या शौचालयाच्या खोलीत खिडकीच्या गजाला चादर अडकवून गळफास घेतला. त्यानंतर कारागृह मुख्य अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. हे देखील वाचा- कोरोना विरोधातील लढ्यासाठी युनियन बँक ऑफ इंडियाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांतर्फे 30 लाख रुपयांचा निधी

कोरोना विषाणूने संपूर्ण महाराष्ट्राला हादरून सोडले आहे. यातच पनवेल येथील कारागृहतील आरोपी बालू गडसिंगे याच्या आत्महत्येने सर्वांनाच धक्का दिला आहे. तसेच या कैद्याच्या आत्महत्या करण्यामागचे कारण अद्यापही समोर आले नाही.