BKC| Photo Credits: Twitter/ANI

मुंबई मध्ये कोरोना लसीकरणाचा वेग वाढवत असतानाच आज (20 एप्रिल) पुन्हा वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स मध्ये असलेल्या बीकेसी लसीकरण केंद्रावर (BKC Jumbo Vaccination Centre) लसीकरणाला तात्पुरता ब्रेक लागला आहे. बीकेसी लसीकरण केंद्रावर गेटवरच ' लस संपल्याचे' फलक लावण्यात आले आहेत. तर मुंबई पोलिसांकडूनही या फिल्ड हॉस्पिटलच्या परिसरात पोलिस व्हॅन मधून लसीचा साठा संपल्याने नागरिकांनी अनावश्यक गर्दी करू नये याबाबत उद्घोषणा केल्या जात आहे. दरम्यान आज बीकेसी केंद्रावर केवळ कोवॅक्सिन लसीचा दुसरा डोस नागरिकांना दिला जात आहे.

ANI ट्वीट च्या माहितीनुसार, बीकेसी जम्बो कोविड सेंटरचे डीन राजेश डेरे (Rajesh Dere) यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडे आज कोविशिल्डचे 350 ते 400 डोस आहेत ते दिले गेले आहेत. तर कोवॅक्सिन साठीचे 2000 डोस आहेत. ते दुसर्‍या डोस साठी राखीव आहेत. दरम्यान डेरे यांनी यावेळी बोलताना आज संध्याकाळपर्यंत कोविशिल्ड चे डोस उपलब्ध होतील अशी माहिती असल्याचं सांगितलं आहे. जर आज संध्याकाळी कोविशिल्डचा साठा आला तर उद्यापासून पुन्हा लसीकरणाचे काम पूर्ववत होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. कोविशिल्डचे डोस कमी असल्याचं काल रात्री आमच्या लक्षात आल्याचेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. (नक्की वाचा: COVID-19 Vaccination FAQs: लस निवडीचा पर्याय असतो का? ते स्मार्टफोन नसल्यास रजिस्ट्रेशन कसं करायचं? CoWIN Portal वर लसीच्या रजिस्ट्रेशन बाबत काही प्रश्नांची उत्तरं इथे घ्या जाणून).

ANI Tweet

पोलिसांकडून बीकेसी परिसरात उद्घोषणा

दरम्यान कालच केंद्र सरकारने 18 वर्षांवरील सार्‍यांचे 1 मे 2021 पासून सरसकट लसीकरण होईल असे म्हटले होते. त्यासंदर्भात आज लस उत्पादक कंपन्यांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी विशेष बैठक घेणार आहेत. मागील आठवड्यातही 9 एप्रिलला अशाचप्रकारे मुंबईत लसींचा साठा नसल्याने दिवसभरासाठी लसीकरणाचे काम थांबलं होतं. त्यानंतर 10 एप्रिलला केवळ पालिकेच्या हॉस्पिटलमध्ये लसीकरण सुरू करत हळूहळू लसीकरणाचं काम पूर्ववत करण्यात आले होते.

मुंबईमध्ये काल रात्री देण्यात आलेल्या माहितीनुसार, 24 तासांत कोरोना विषाणूच्या 7381 रुग्णांची नोंद झाली असून, एकूण रुग्णसंख्या 5,86,692 वर गेली आहे. तर शहरात 8583 रुग्ण बरे झाले आहेत व 57 रुग्णांचा मृत्यू नोंदवण्यात आला होता.