मुंबई विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द झाल्या असल्या तरीही महाराष्ट्रात आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा होणार आहे. नुकतेच विद्यापीठाकडून या परीक्षांचं अंतिम वर्षाच्या लेखी आणि प्रात्याक्षिक परीक्षांचे वेळापत्रक जारी करण्यात आले आहे. दरम्यान प्रसिद्ध केलेल्या वेळापत्रकानुसार परीक्षा 16 जुलै पासून सुरू होणार आहेत. muhs.ac.in या विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर लेखी आणि प्रात्याक्षिक परीक्षांचे वेळापत्रक सोबतच विद्यार्थ्यांसाठी गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत. BHMS,नर्सिंग च्या विद्यर्थ्यांचे अंतिम वर्षाचे वेळापत्रक इथे पहायला मिळेल.
आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांसाठी अभ्यास करताना कोणत्याही प्रकारचा ताण न घेता अभ्यास करण्याचं आवाहन करण्यात आले आहे. कोरोना संकट काळात सध्या विद्यार्थ्यांनी सरकारी नियमावलीचं पालन करावं. अनावश्यक प्रवास टाळावा तसेच परीक्षांबद्दलच्या माहितीबाबत अधिकृत संकेतस्थळावरील माहितीच ग्राह्य धरावी असेही सांगण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना काही तक्रार असल्यास अधिकृत फोन नंबर किंवा इमेलच्या माध्यमातून संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
दरम्यान 4 जून दिवशी महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी अंडरग्रज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट परिक्षा पुढे ढकलब्यासाठी परवानगी दिली होती. मंत्री अमित देशमुख यांनी कोश्यारींची भेट घेऊन परीक्षा पुढे ढकलण्याबाबत निर्णय घेतला होता. त्यानुसार आता वेळापत्रक जारी करण्यात आलं आहे. दरम्यान यंदा महाराष्ट्र यूनिवर्सिटी ऑफ हेल्थ साइंसेजच्या परीक्षा मे महिन्यात घेतल्या जाणार होत्या मात्र कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर त्या पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आता लवकरात लवकर परीक्षा पार पडल्या तर उत्तीर्ण विद्यार्थ्यांना इंटर्नशीप पूर्ण करून लवकर कोरोना संकटात विद्यार्थ्यांना कोव्हिड योद्धा म्हणून मदत करण्याची संधी मिळेल.