शिवशाही बस (Shivshahi Bus Accident) आणि कंटेनरच्या भीषण अपघातात एकजण ठार झाला आहे तर इतर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. संजय एकनाथ भायदे (रा.मुरुड, वय 52 वर्षे) असे मृत्यू झालेल्या प्रवाशाचे नाव आहे. पुणे (Pune) शहरानजीक असलेल्या पुणे-सासवड रस्त्यावर असलेल्या उरळी देवाची गावालगत रविवारी (18 सप्टेंबर) रात्री उशीरा ही घटना घडली. या घटनेत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) शिवशाही बसच्या पुढच्या भागाचा चक्काचूर झाला आहे. अपघातात जखमी झालेल्या सर्वांना जवळच्याच रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
अपघाताबाबत माहिती अशी की, शिवशाही बस पंढरपूरहून प्रवासी घेऊन पुण्याच्या दिशेने निघाली होती. बस पुणे-सासवड रस्त्यावर असलेल्या उरळी देवाची गावालगत येताच कंटेनर थेट बसच्या पुढे आला. ज्यामुळे दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात घडला. हा कंटेनर उरळी देवाची फाट्याजवळ असलेल्या गोदामातून निघाला होता. एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, प्रवाशांसोबतच या घटनेत चालक आणि वाहकही गंभीर जखमी झाले आहेत. (हेही वाचा, Shivshahi Bus Accident: नाशिक-औरंगाबाद शिवशाही बसला अपघात; एकाचा मृत्यू)
अपघाताची माहिती मिळाल्यावर पोलीस घनटास्थळी पोहोचले. त्यांनी तातडीने मदत आणि बचाव कार्यास सुरुवात केली. मात्र, अपघात झालेल्या ठिकाणी ही दोन्ही अपघातग्रस्त वाहने बराच काळ पडून होती. त्यामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली. त्यामळे पुणे सासवड मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. काही वेळाने पोलिसांनी दोन्ही वाहने हटवली. त्यामुळे वाहतूक पूर्ववत झाली.