महाराष्ट्रात आजपासून 5 महिन्यांनंतर MSRTC ची सेवा पूर्ण क्षमतेने; 77 हजार कर्मचारी कामावर परतले
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Twitter)

मागील 5 महिन्यांपासून एसटी कर्मचारी संपावर असलेली लालपरीची सेवा राज्यात विस्कळीत झाली होती. पण आज 22 एप्रिलपासून आता एसटीची सेवा पुन्हा पूर्वपदावर येण्यास सुरूवात झाली आहे. 77 हजार कर्मचारी कामावर रूजू झाल्याने आता एसटी पूर्ण क्षमतेने धावण्यासाठी सज्ज झाली आहे. एसटीची वाहतूक सेवा पुन्हा सुरू झाल्याने महामंडळाच्या कर्मचार्‍यांसोबत गावात कानाकोपर्‍यात राहणार्‍या प्रवाशांसाठी हा मोठा दिलासा आहे.

'गाव तिथे एसटी' अशी ओळख असणार्‍या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचार्‍यांनी पुकारलेल्या संपाचा विद्यार्थी, नागरिक यांना मागील 5 महिन्यात मोठा फटका बसला. पण आता हळूहळू स्थिती सुधारत आहे. दरम्यान एसटी कर्मचार्‍यांनी राज्य सरकार मध्ये विलिनीकरण करावं या प्रमुख मागणीसह महागाई भत्ता, घरभाडं भत्ता आणि पगारवाढ यासाठी आंदोलन छेडलं होतं. सर्वोच्च न्यायालयापर्यंत ही लढाई पोहचली होती.

काही दिवसांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने एसटी कामगारांना कामावर हजर होण्यासाठी शुक्रवार, 22 एप्रिल पर्यंत मुदत दिली होती. काल गुरुवारी 21 एप्रिल रोजी 2,992 नवीन एसटी कर्मचारी कामावर दाखल झाले आहेत. एकूण हजेरीपटावरील 81,683 कर्मचाऱ्यांपैकी केवळ 4,721 कर्मचारीच उरले होते तेही सेवेत दाखल होतील, अशी माहिती मिळत असल्याने लालपरी पुन्हा प्रवाशांच्या सेवेत दाखल होण्यास सज्ज झाली आहे.  नक्की वाचा: MSRTC: एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण होणार नाही; मंत्रिमंडळाने स्वीकारला त्रिसदस्यीय समितीचा अहवाल.

कोरोना संकटात एसटी सेवा बंद होती त्यामुळे महामंडळाला मोठा आर्थिक फटका बसला होता. कोरोना संकट निवळताच कर्मचार्‍यांनी संप पुकारल्याने पुन्हा आर्थिक तोटा सहन करावा लागत होता. पण आता सुट्ट्यांचा हंगाम सुरू झाला आहे. त्यामध्ये लालपरी पुन्हा रस्त्यावर उतरत असल्याने गावकडे जाणार्‍या अनेकांना ही दिलासादायक बाब आहे. आतापर्यंत अनेक प्रवाशांना पर्यायी वाहतूक सेवेचा आधार घेत इच्छित स्थळी जावे लागत होते.