MSRTC Employee Strike: मुंबई मधील आझाद मैदानातील आंदोलनातून सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर यांची माघार; पुढील आंदोलनाचा निर्णय कर्मचार्‍यांवर सोडल्याची घोषणा
Gopichand Padalkar | (Photo credit : Facebook)

महाराष्ट्र सरकारकडून काल एसटी कर्मचार्‍यांना ( MSRTC Employee) काल 41% पगावरवाढीची घोषणा झाली आहे. त्यानंतर आता मुंबई सह राज्यातील एसटी कर्मचारी त्यांचा संप मागे घेणार का? याकडे सार्‍यांचे लक्ष लागले आहे. अशामध्येच आता मागील 15 दिवसांपासून मुंबईच्या आझाद मैदानावर (Azad Maidan) सुरू असलेल्या आंदोलनातून सदाभाऊ खोत (Sadabhau Khot), गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी माघार घेतल्याचं जाहीर केले आहे. दरम्या यावेळेस 'एसटी कर्मचार्‍यांचा हा ऐतिहासिक लढा होता पण पुढील निर्णय हा कर्मचार्‍यांनी घ्यायचा आहे. त्यांच्यावर आमचा कोणताही दबाव नसेल' असे सांगत भाजप नेते सदाभाऊ खोत आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी आपण बाहेर पडत असल्याची घोषणा केली आहे.

मुंबई सोबतच महाराष्ट्राच्या इतर भागात सुरु असलेलं आंदोलन सुरु ठेवायचं की बंद करायचं याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घ्यायचा आहे असेही त्या दोघांनी म्हटलं आहे. मुंबईतील काही आंदोलकांनी मीडीयाशी बोलताना पगारवाढीच्या आमिषावर आम्ही खूष नाही आम्हांला विलिनीकरणावर निर्णय हवा असल्याचं सांगत आंदोलन कायम ठेवलं जाईल असे म्हटलं आहे. नक्की वाचा: ST Workers Strike: महाविकासआघाडी सरकारचा निर्णय, एसटी कर्मचाऱ्यांचे पगार वाढले ; चालक, वाहक, लिपीक यांना किती वेतन? घ्या जाणून .

राज्य सरकारकडून विलिनीकरणावर जी भूमिका घेण्यात आली आहे तिच्याशी दोन्ही नेत्यांची मिळतीजुळती भूमिका आहे. कदाचित यावरूनच कर्मचाऱ्यांसोबत त्यांचे मतभेद झाल्याची चर्चा आहे. 'विलिनीकरणाच्या मुद्यावर जर कर्मचारी आंदोलन सुरुच ठेवणार असतील तर आमच्या त्यांना शुभेच्छा आणि पाठिंबा असल्याचेही पडळकर यांनी स्पष्ट केले आहे. समितीचा अहवाल येईपर्यंत आहे ते पदरात पाडून आंदोलनाचा पुन्हा निर्णय़ घेतला जाऊ शकतो असेही त्यांनी म्हटलं आहे.