उद्या 4 सप्टेंबर रोजी होणाऱ्या एमपीएससी संयुक्त पूर्वपरीक्षेसाठी (MPSC Exam) लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. मात्र त्यासाठी त्यांना परीक्षेचं ओळखपत्र सोबत बाळगणं गरजेचं आहे. यासंदर्भातील परिपत्रक राज्य सरकारनं काढलं आहे. परीक्षेसाठी उमेदवारांना केंद्रावर पोहण्यास कोणती अडचण होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. (महाराष्ट्र लोकसेवा आयोग कार्यालयाचे एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी अधिकृत ट्विटर हँडल)
गेल्या अनेक दिवसांपासून विद्यार्थी वाट पाहत असलेली एमपीएससीची संयुक्त पूर्वपरीक्षा उद्या होणार आहे. विद्यार्थ्यांना केंद्रावर पोहोचण्यासाठी अडचणी होऊ नये म्हणून राज्य सरकारनं याबाबत रेल्वे विभागाला पत्र लिहलं होतं. यात विद्यार्थांना प्रवासाची मुभा द्यावी अशी मागणी करण्यात आली होती. त्यानंतर रेल्वे विभागाने विद्यार्थ्यांना प्रवासाची परवानगी दिली आहे.
महाराष्ट्र दुय्यम सेवा 'अराजपत्रित गट ब'साठी ही परीक्षा घेतली जात आहे. यापूर्वी ही परीक्षा 11 मार्च रोजी आयोजित करण्यात आली होती. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे 9 एप्रिल रोजी घेण्याचे ठरवले. परंतु, मार्च मध्ये झालेल्या एमपीएससी परीक्षेनंतर अनेक विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याने परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. त्यानंतर ही परीक्षा पुढे ढकलत 4 सप्टेंबर रोजी घेण्याचे ठरवण्यात आले.
दरम्यान, सध्या कोविड-19 संकटाच्या पार्श्वभूमीवर केवळ लसीकरण पूर्ण झालेल्यांनाच लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे लसीचे दोन्ही डोस घेऊन 15 दिवस झालेल्या व्यक्ती लोकलने प्रवास करु शकतात. अशा प्रवाशांना मुंबई लोकलचा पास दिला जात आहे. मात्र एमपीएससी परीक्षेसाठी लोकल प्रवासाची परवानगी देण्याची मागणी काही विद्यार्थ्यांनी देखील रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे केली. तसंच भाजप आमदार आशिष शेलार यांनी देखील परवानगीची मागणी केली होती. या सर्व मागण्यांची दखल घेत विद्यार्थ्यांना प्रवासाची मुभा देण्यात आली आहे.