एमपीएससी 2020 पूर्व परीक्षेची (MPSC 2020 Prelims) तारीख आज अखेर जाहीर होणार आहे. कोरोना व्हायरस संकटामुळे मागील वर्षभरात ही परीक्षा अनेकदा रद्द करण्यात आली होती. काल पुन्हा एकदा एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे राज्यातील विविध ठिकाणी विद्यार्थ्यांनी रस्त्यावर येत निर्दशने केली. यानंतर विरोधक आणि सत्ताधारी पक्षातील अनेक नेत्यांनी परीक्षा वेळेत घेण्याची मागणी उचलून धरली. अखेर मुख्यमंत्र्यांनी फेसबुक लाईव्ह माध्यमातून जनतेशी संवाद साधत परीक्षा पुढील 8 दिवसांतच होईल, असे सांगितले. तसंच या परीक्षेची तारीख आज जाहीर होईल, असे सांगून विद्यार्थ्यांना आश्वस्त केले आहे. त्यामुळे आता परीक्षा नेमक्या कधी होणार, याकडे राज्यभरातील एमपीएससी चे परीक्षार्थी त्याचबरोबर पालकांचे लक्ष लागले आहे.
एमपीएससीच्या परीक्षेच्या कामांसाठी मोठा कर्मचारी वर्ग लागतो. परंतु, हा कर्मचारी वर्ग सध्या इतर कामांमध्ये गुंतला आहे. तसंच परीक्षार्थींच्या सुरक्षेसाठी त्यांची कोरोना चाचणी करणे आवश्यक आहे. यासाठी आठवडाभराचा कालावधी घेत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. तसंच परीक्षा सातत्याने लांबणीवर पडत असल्याने विद्यार्थ्यांना होणाऱ्या मानसिक त्रासाबद्दल त्यांनी दिलगिरीही व्यक्त केली.
(हे ही वाचा: Gopichand Padalkar on MPSC Exam: 'एमपीएससी' ची परीक्षा 14 मार्चला घ्यावी अन्यथा रस्त्यावरच झोपून राहणार- गोपीचंद पडळकर)
दरम्यान, काल अचानक परीक्षा रद्द झाल्याचा निर्णय जाहीर होताच राज्यभरातील विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा धारण केला. यासाठी त्यांनी रस्त्यावर उतरुन आपला निषेध नोंदवला. तसंच निवडणूका, इतर राजकीय कार्यक्रम किंवा इतर वेळेस कोरोना आड येत नाही. मग कोविड-19 संकट केवळ एमपीएससी परीक्षेच्या वेळेसच कसे आड येते? असे संतप्त सवालही त्यांनी केले. त्याचबरोबर विरोधक आणि सत्ताधारी पक्षातील नेत्यांनीही परीक्षा घेण्याची मागणी केली. या सगळ्याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी जनतेशी संवाद साधला आणि परीक्षा आठ दिवसांतच होईल, असे वचन दिले.