डॉक्टरांबाबतच्या ‘त्या’ व्यक्त्यव्यामुळे खासदार संजय राऊत अडचणीत; महाराष्ट्र IMA ने केली माफीची मागणी 
संजय राऊत । Photo Credits: Twitter/ ANI

नुकतेच एबीपी माझा या वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये शिवसेनचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी डॉक्टरांबद्दल अपशब्द काढले होते. याबाबत भाजपने त्यांच्यावर निशाणा साधत त्यांच्याकडून माफीची मागणी केली होती. यासोबतच सोशल मिडियावरही संजय राऊत यांच्या व्यक्तव्याबद्दल रोष पसरला होता. आता इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (IMA) महाराष्ट्र शाखेने याबाबत आपले विचार मांडले आहेत. आयएमए कार्यकारिणीच्या रविवारी झालेल्या बैठकीत संजय राऊत यांनी माफी मागावी, या मागणीचा तसेच राऊत यांच्या निषेधाचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.

एबीपीला मुलाखत देताना संजय राऊत म्हणाले होते की, ‘डॉक्टरपेक्षा कम्पाऊन्डरला जास्त कळते, मी तर नेहमी कम्पाऊन्डरकडून औषध घेतो’, ‘डब्ल्यूएचओला काय कळते, सीबीआयसारखेच आहे ते, इकडून तिकडून माणसे गोळा केलेली असतात, डब्ल्यूएचओच्या नादाला लागले म्हणून जास्त कोरोना वाढला.’ आता, संजय राऊत यांची ही वक्तव्ये डॉक्टरांचा अवमान करणारी असून, त्यांच्याविरुद्ध आयएमएने पोलिसात तक्रार दाखल केली पाहिजे, अशी भावना बैठकीत बहुतांश पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्याची माहिती आहे.

आयएमएच्या महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष डॉ.अविनाश भोंडवे यांनी लोकमतला सांगितले की, सध्याच्या कोरोना विषाणूच्या संकटकाळात ज्या प्रकारे डॉक्टर काम करत आहे ते पाहता, त्यांचे कौतुक करायचे सोडून राऊत यांनी डॉक्टरांपेक्षा कम्पाऊन्डरना जास्त कळते असे म्हणणे निषेधार्ह आहे. अशा प्रकारे राऊत यांनी देशभरातील डॉक्टरांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यांनी डॉक्टरांची माफी मागावी अशी आमची मागणी आहे.’

यासोबतच संजय राऊत यांच्याविरुद्ध पोलिसात तक्रार करण्याबाबत विचार करत असल्याचेही भोंडवे यांनी सांगितले. दरम्यान, काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी सुशांत सिंह राजपूतच्या कुटुंबाबद्दल निराधार व्यक्तव्य केले होते. सुशांतच्या वडिलांनी दुसरे लग्न केल्याने सुशांत व त्यांचे वडील यांच्यात दुरावा आला, अशा आशयाचे ते विधान होते. त्यानंतर सुशांतच्या कुटुंबीयांनीही संजय राऊत यांच्याकडे माफीची मागणी केली होती.