रेल्वे रुळावर जखमी अवस्थेत पडलेल्या महिलेच्या मदतीसाठी मोटरमनने चालती लोकल थांबविली. रुळावर विव्हळत पडलेल्या 25 वर्षीय पल्लवी अवनूर (Pallavi Avnoor) ला मोटरमनने आणि रेल्वेतील 2 प्रवाशांनी मदत करुन राजावाडी रुग्णालयात दाखल केले. सतीश टोंगळे (Satish Tongle) असे या मोटरमनचे नाव आहे. ही घटना विद्याविहार (Vidyavihar) आणि घाटकोपर (Ghatkopar) स्थानकादरम्यान घडली.
मटाच्या वृत्तानुसार, पल्लवी अवनूर ही बुधवारी 2 वाजण्याच्या सुमारास विद्याविहार-घाटकोपर स्थानकादरम्यान रेल्वेरुळावर विव्हळत पडली होती. त्याचवेळेस सीएसएमटीहून अंबरनाथला जाणारी धिमी लोकल जात होती. ही रेल्वे चालवणा-या मोटरमन सतीश टोंगळे यांनी पल्लवीला जखमी अवस्थेत पाहिले. त्यांनी तात्काळ रेल्वे थांबवून पल्लवीच्या मदतीला धावले. त्यांनी इतर प्रवाशांच्या मदतीने पल्लवीला रेल्वेमध्ये नेले. त्यानंतर घाटकोपर स्टेशनला ट्रेन थांबताच त्यांनी स्ट्रेचर हमालाच्या मदतीने राजावाडी रुग्णालयात दाखल केले. पल्लवीच्या डोक्याला आणि छातीला जबर मार लागला असून कुर्ला रेल्वे पोलीस अधिक तपास करत आहेत.
हेही वाचा- मानखुर्द-वाशी दरम्यान मुंबई लोकलवर दगडफेक, या दगडफेकीत मोटरमन गंभीर जखमी
मोटरमन सतीश यांच्या प्रसंगावधानामुळे पल्लवीला नवे जीवदानच मिळाले असल्याने तिच्या कुटूंबियांनी त्यांचे आभार मानले आहे. शेवटी मोटरमनही ही तुमच्या-आमच्या सारखीच माणसे आहेत, त्यामुळे जेव्हा रेल्वेवर दगडफेकीच्या घटना घडतात, तेव्हा भरडला जातो तो मोटरमनच... कोणतीही कठीण परिस्थिती आली तरीही मोटरमन रेल्वेप्रवाशांना योग्य ठिकाणी पोहोचवण्यास नेहमीच तत्पर असतो. त्यामुळे मोटरमनचाही विचार केला जावा आणि दगडफेक करणे, मारहाण करणे ह्या गोष्टी टाळाव्यात असेच येथे सांगावेसे वाटते.