धक्कादायक! नाला ओलांडताना अचानक आलेल्या पुरात वाहून गेल्याने मायलेकींचा मृत्यू; यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यातील घटना
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI))

नाला ओलांडताना अचानक आलेल्या पुरात वाहून गेल्याने मायलेकींचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यातील दिग्रस (Digras) तालुक्यात मंगळवारी संध्याकाळी घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण दिग्रस तालुक्यात एकाच खळबळ उडाली आहे. यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसत आहे. शेतातील मजुरीहून घरी परतताना गावालगतच्या एका नाल्यास पूर आला होता. दरम्यान, नाला ओलांडताना अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने त्यात दोघीही वाहून गेल्या होत्या. तसेच दोघींचाही मृतदेह उत्तरीय तपासणीकरीता दिग्रस ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत, अशी माहिती लोकसत्ताने आपल्या वृत्तात दिली आहे.

कविता किशोर राठोड (वय 36) आणि निमा किशोर राठोड (वय 16) अशी मृत मायलेकींची नावे आहेत. कविता आणि निमा या दोघेही मंगळवारी एका शेतात मजुरीकरीता गेल्या होत्या. शेत मजूरी करून परतताना सायंकाळी नाला ओलांडताना पाण्याचा प्रवाह वाढल्याने त्यात दोघीही वाहून गेल्या. गावकऱ्यांना याची माहिती होताच त्यांनी कविता आणि निमा या दोघींना शोधण्यास सुरुवात केली आहे. मात्र, रात्र झाल्याने गावकऱ्यांनी शोधमोहीम थांबवली. आज बुधवारी सकाळी 7 वाजता पुन्हा शोधमोहीम सुरू केली. गावकऱ्यांनी बुधवारी सकाळी 7 वाजता पुन्हा शोध सुरु केल्यानंतर दोघींचाही मृतदेह गावाजवळच्या एका शेतात सापडला. यामुळे राठोड कुटुंबियांवर दुख:चे डोंगर कोसळले आहे. हे देखील वाचा- धक्कादायक! पालघर जिल्ह्यात किरकोळ वादातून शेजाऱ्याचा कान कापणाऱ्या दोघांना अटक

यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील पाथ्रडगोळे येथे मुसळधार पावसाने लगतच्या नाल्याचे पाणी गावात व शेतात शिरले आहे. यात गोठ्यात बांधून असलेल्या बैल वाहून गेल्याची घटना घडली आहे. तसेच संत्रा, कपाशी, सोयाबीय, भेंडी या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.