धक्कादायक! पालघर जिल्ह्यात किरकोळ वादातून शेजाऱ्याचा कान कापणाऱ्या दोघांना अटक
Representational Image (Photo Credits: PTI)

पालघर (Palghar) जिल्ह्यात किरकोळ वादातून शेजाऱ्याचा कान कापल्याची घटना उघडकीस आली आहे. ही धक्कादायक घटना मंगळवारी संध्याकाळी घडली आहे. याप्रकरणी दोन जणांना अटक केली असून स्थानिक पोलीसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे. पीटीआयने वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी यांच्यात मंगळवारी क्षुल्लक कारणांवरून वाद झाला होता. या वादातून आरोपीने आपल्या मुलासह फिर्यादीला जबर मारहाण करत त्याचा कान कापून टाकला. तसेच या भांडणात मध्यस्ती करणाऱ्या फिर्यादीच्या भावालाही आरोपीने जबर मारहाण केल्याचे समजत आहे. ज्यामुळे त्यालाही जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेने आजूबाजुच्या परिसरात भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे.

प्रभाकर म्हात्रे (43) आणि प्रीतम म्हात्रे (22) असे आरोपींची नावे आहेत. प्रभाकर आणि त्यांच्या शेजारी राहणाऱ्या जगदीश पाटील (35) यांचे मंगळवारी संध्याकाही क्षुल्लक कारणांवरून वाद झाला होता. या वादातून प्रभाकर आणि प्रीतम यांनी मिळून जगदीश यांचा उजवा कान कापून टाकला. तसेच हे भांडण सोडवण्यासाठी मध्यस्ती पडलेल्या जगदीशच्या भावालाही या दोघांनी बेदम मारहाण केली. ज्यामुळे तो जागीच बेशुद्ध पडला असून जवळच्या रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले होते. स्थानिक लोकांनी माहिती देताच सफाले पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन प्रभाकर आणि त्याचा मुलगा प्रीतमला अटक केली आहे. हे देखील वाचा- सांगली: नाहक मागण्यांच्या त्रासाला कंटाळून एका शिक्षकाचा पोटच्या मुलाला ठार मारण्याचा प्रयत्न; आरोपी अटकेत

तसेच याप्रकरणी आरोपींना न्यायालयासमोर उभे करण्यात येणार आहे. तसेच पोलिसांनी दोन्ही पक्षाची जबानी नोंदवली आहे. याप्रकरणी सफाले पोलीस अधिक चौकशी करत असून आरोपींनी याआधीही काही गुन्हे केले आहेत की नाही? याचाही शोध घेतला जात आहे.