महाराष्ट्रातील चंद्रपूरच्या (Chandrapur) कोठारी (Kothari) येथे एका आई आणि मुलीचा मृतदेह सापडला आहे. गावातील लोकांनी याची माहिती पोलिसांना दिली होती, त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयात पाठवले. मिळालेल्या माहितीनुसार, झेलाबाई पोचू चौधरी (वय 73) व तिची मुलगी माया मारोती पुलगमकर (वय 45) यांचा काल सायंकाळी मृत्यू झाला आहे. महत्वाचे म्हणजे भुकेने (Starvation) या दोघींचा बळी घेतल्याचे समोर आले आहे. मृत्युपूर्वी अनेक दिवस या दोघींच्याही पोटात अन्नाचा कणही नव्हता.
या दोघी मायलेकी कोठारी गावात राहत होत्या. त्यांच्या कुटुंबात दुसरे कोणीच नव्हते. झेलाबाईच्या पतीचे 7 वर्षांपूर्वी निधन झाले होते. मायाचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले होते, पण काही दिवसांनंतर ती सुद्धा माहेरी येऊन राहू लागली. काही महिन्यांपूर्वी एका माकडाशी झालेल्या झटापटीत झेलाबाईच्या पाठीच्या कण्याला दुखापत झाली होती, ज्यामुळे तिला चालताही येत नव्हते. ती इतके महिने बेडवरच होती. तिची मुलगीच तिचा एकमेव आधार होती.
या दोघीही आजाराने ग्रस्त होत्या. त्यांच्याकडून कुठलीही कामे होत नव्हती. त्यामुळे अनेकदा त्यांना खायला मिळत नसे. गावात भिक्षा मागून या दोघी आपला उदरनिर्वाह करायच्या. मायलेकी दोघीही जमेल तसे भिक्षा मागून आणायच्या. परंतु गावात फिरणाऱ्या या दोघीही अचानक दिसेनाशा झाल्या, त्यानंतर गावकऱ्यांना संशय आल्याने त्यांनी या दोघींची घर गाठले, त्यावेळी या दोघींचेही मृतदेह जमिनीवर पडलेले आढळले.
त्यानंतर पोलिसांकडून मृतदेहांचा पंचनामा केल्यानंतर त्यांना शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. ग्रामस्थांनी दोन्ही मृतदेह गावात पोचताच मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले. कोठारी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. (हेही वाचा: Thane Collapse: ठाणेमधील राबोडी परिसरात 4 मजली इमारतीचा स्लॅब कोसळून 3 जण जखमी)
दरम्यान, महाराष्ट्रात जिथे कोरोनाच्या या काळात सरकारकडून शिवभोजन थाळीचे मोफत वितरण केले जात आहे. जिथे रेशन दुकानातून अन्नधान्याचे योग्य वितरण होत आहे, तिथे महाराष्ट्रातील चंद्रपूरमधून उपासमारीमुळे आई आणि तिच्या मुलीचा मृत्यू ही बाब लज्जास्पद आहे.