सर्वाधिक श्रीमंत असलेल्या टॉप २० आमदारांमध्ये महाराष्ट्रातील ४ आमदारांचा समावेश

मुंबई: देशभरातील सुमारे ३ हजार पाचशे आमदारांच्या वार्षिक उत्पन्नानुसार नुकतीच एक क्रमवारी लावण्यात आली. यात देशातील एकूण आमदारांपैकी सर्वाधिक श्रीमंत असलेल्या टॉप २० आमदारांचीही यादी तयार करण्यात आली. या यादीत २० पैकी महाराष्ट्रातील ४ आमदारांचा समावेश आहे. यादीनुसार दुसऱ्या क्रमांकावर आहेत भाजप आमदार मंगलप्रभात लोढा.

हेच ते महाराष्ट्रातील ४ आमदार

भाजप आमदार मंगलप्रभात लोढा यांचे एकूण वार्षिक उत्पन्न आहे सुमारे ३४.६६ कोटी रुपये. मंगलप्रभात लोढा हे प्रख्यात उद्योगपती आहेत. पण, गंमत अशी की, लोढा यांनी ही संपत्ती दाखवताना आपण नोकरी करत असल्याचे म्हटले आहे. सहाव्या क्रमांकावर (महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकावर) आहेत सोलापूर जिल्ह्यातील आमदार दिलीप सोपल. वकिली आणि शेतीव्यवसाय करणाऱ्या सोपल यांचे वार्षिक उत्पन्न आहे सुमारे ९.८५ कोटी रुपये. दरम्यान, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी देशात १७वा (महाराष्ट्रात तिसरा) क्रमांक पटकावला आहे. त्यांचे वार्षिक उत्पन्न ५.६१ कोटी रुपये इतके आहे. दरम्यान, राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण हे देशातील सर्वात श्रीमंत असलेल्या टॉप २० आमदारांच्या यादीत २०व्या क्रमांकावर (महाराष्ट्रात चौथ्या) आहेत.

हे आहेत सर्वात गरीब आमदार

दरम्यान, महाराष्ट्राचे उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे सर्वाधिक कमी उत्पन्न असलेले आमदार आहेत. त्यांचे वार्षिक उत्पन्न केवळ ९.०९ लाख रुपये इतके आहे.

आमदार एन नागराजू सर्वात श्रीमंत आमदार

कर्नाटकचे काँग्रेस आमदार एन. नागराजू हे देशातील सर्वात श्रीमंत आमदार ठरलेआहेत. त्यांचे वार्षिक उत्पन्न हे १५७.०४ कोटी रुपये इतके आहे.