सध्या कोरोना विषाणू (Coronavirus) बाबत महाराष्ट्र (Maharashtra) देशात अग्रेसर आहे व राज्यातील मुंबई (Mumbai) येथे सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळून आले आहे. मंगळवारी लो-ट्रान्समिशन झोन असलेल्या मुलुंड (Mulund) मधील एका झोपडपट्टीत (Slum) अचानक 50 पेक्षा जास्त कोविड-19 ची प्रकरणे समोर आली. यावरून शहरातील झोपडपट्टीच्या परिसरात कोरोना व्हायरस किती वेगाने पसरू शकतो अंदाज येऊ शकेल. बीएमसी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आठवड्याच्या सुरूवातीच्या काळात शहरातील चिन्हांकित केलेल्या 1,927 कंटेन्मेंट झोनपैकी, 80% परिसर हे झोपडपट्टी किंवा चाळी यांसारखी गर्दीची ठिकाणे आहेत. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या बीएमसीच्या (BMC) सर्वेक्षणात असे आढळले आहे की, शहरातील मृत्यूंपैकी 60% मृत्यू हे झोपडपट्ट्यांमध्ये आणि तत्सम भागात घडले आहेत. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे.
कंटेन्मेंट झोनपैकी तब्बल 641 रेड झोनमध्ये कोरोना व्हायरसचा उद्रेक झाला होता, तर 502 ऑरेंज झोन होते, जिथे संक्रमण नियंत्रणात येण्याच्या मार्गावर होते. धारावी हा परिसर रेड झोनपैकी एक असून तिथे सर्वाधिक 632 घटना समोर आल्या आहेत. एम-ईस्ट प्रभागातील मानखुर्द ते शिवाजी-नगर हा 100% झोपडपट्ट्यांचा परिसर, एक चिंतेचा विषय बनला आहे. मेस्टमध्ये 460 घटनांपैकी 51 जणांचा मृत्यू झाला आहे. अशा परिसरात लोक 10x10 च्या खोलीत राहत असल्याने इथे सामाजिक अंतर पाळणे कठीण होऊन बसते.
कफ परेडसारख्या पॉश भागात असलेल्या झोपडपट्ट्यांची अवस्था यापेक्षा चांगली नाही. 50,000 लोकसंख्येची संयुक्तपणे लोकसंख्या असलेल्या गणेशमूर्ती नगर, आंबेडकर नगर आणि गीता नगर येथे 50 कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. स्थानिक नगरसेविका हर्षिता नार्वेकर यांनी सांगितले की, त्यातील 25 प्रकरणे गणेशमूर्ती नगरमधील आहेत. पश्चिम उपनगरात अंधेरी जुहू गल्ली, नेहरू नगर आणि गिलबर्ट हिलच्या घटनांमध्येही तीव्र वाढ झाली. नेहरू नगरमध्ये 35,000 लोकसंख्या असलेल्या अत्यंत गर्दी असलेल्या परिसरात कोरोना व्हायरसचे 76 रुग्ण आढळले असून, 5 मृत्यूंची नोंद झाली आहे. (हेही वाचा: महाराष्ट्रातील कोरोना विषाणूची परिस्थिती गंभीर, 36 पैकी 34 जिल्हे बाधित; उपाय योजनेबाबत केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन करणार मुख्यमंत्र्यांशी चर्चा)
‘एल’ प्रभागातील कुर्ला, चुन्नाबट्टी आणि साकी नाका येथील झोपडपट्ट्यांमध्ये 30 जणांचा मृत्यू झाला आहे. धारावी येथे मंगळवारी कोविड-19 चे 33 नवीन रुग्ण आढळले. या भागात एकूण सकारात्मक घटनांची संख्या 665 झाली आहे, ज्यात 20 मृत्यूंचा समावेश आहे. अशा परिसरामध्ये लोक सामुहिक शौचालयांचा वापर करतात व हा विषाणू संक्रमित होण्याचे हे फार मोठे कारण आहे.