जीवाची पर्वा न करता, रात्र की दिवस न पाहता महाराष्ट्र पोलीस (Maharashtra Police) नेहमीच तत्परतेने आपले काम करत असतात. सेवेच्या ठिकाणी चांगले निवासस्थान उपलब्ध झाल्यास पोलीस अधिक कार्यक्षमतेने काम करू शकणार आहेत. त्यासाठी विविध पर्यायांचा अवलंब करून, जास्तीत जास्त संख्येने आणि सुविधांनी युक्त निवासस्थाने बांधण्याची गरज आहे. त्यासाठी सर्वंकष असा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आज दिले. पोलिसांना निवासस्थाने उपलब्ध व्हावीत यासाठी महाराष्ट्र पोलीस गृहनिर्माण महामंडळातर्फे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत सादरीकरण करण्यात आले.
या बैठकीत पोलिसांना निवासस्थान बांधून देणाऱ्या खासगी विकासकांंना सवलत देणे, पुनर्विकासाच्या प्रस्तावित प्रकल्पातील रहिवासी क्षेत्राच्या आरक्षणात सवलत देऊन निवासस्थानाची उपलब्ध करून घेणे, राज्यातील गृह विभागाच्या जागांचा पोलीस गृहनिर्माण महामंडळाच्या माध्यमातून विकास करणे आणि त्यासाठी महामंडळाला बीज भांडवल उपलब्ध करून देणे अशा विविध पर्यायांबाबत चर्चा करण्यात आली. म्हाडाच्या भुखंडावरील निवासस्थान इमारतींचा पुनर्विकास याबाबतही चर्चा झाली.
यासह, मराठी रंगभूमीच्या वैभवाला साजेसे आणि भव्य असे कलादालन व्हावे, यासाठी यंत्रणांनी समन्वयाने प्रकल्प आराखडा आणि त्यासाठीची कार्यवाही करावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. गिरगांव चौपाटी येथील बिर्ला क्रीडा केंद्राच्या पुनर्रचना प्रकल्पांतर्गत मराठी रंगभूमीचे कलादालन उभे करण्याचे नियोजन आहे. पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी गिरगाव चौपाटीवर उभारण्यात येणाऱ्या या कलादानाची इमारत देखील देखणी आणि वास्तू कलेची उत्तम नमूना असावी अशी अपेक्षा व्यक्त केली. (हेही वाचा: मुंबईच्या आयकॉनिक Double-Decker Buses चा होणार लिलाव; BEST च्या ताफ्यामध्ये येणार नव्या प्रगत डबल-डेकर)
मुख्यमंत्र्यांनी मराठी रंगभूमीच्या वैभवाला साजेशे असे भव्य कलादालन साकारण्यात यावे अशी अपेक्षा व्यक्त केली. ते म्हणाले, कलादानाची उभारणी करताना त्यामध्ये नाविन्यपूर्ण अशा बाबींचा समावेश करण्यात यावा. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात यावा. कलादालनाचा परिपूर्ण प्रकल्प आराखडा तसेच अनुषांगीक प्रस्ताव सादर करण्यात यावा. तसेच संबंधित यंत्रणांनी समन्वयाने गतीने कार्यवाही करण्याचे निर्देशही दिले.