बृहन्मुंबई विद्युत पुरवठा व परिवहन किंवा बेस्टद्वारा (BEST) चालवल्या जाणाऱ्या लाल रंगाच्या 'डबल डेकर बसेस' (Double-Decker Buses) या मुंबईच्या (Mumbai) आयकॉन म्हणून पाहिल्या जातात. मुंबई शहरात बेस्टच्या डबल डेकर बसेसनी दररोज हजारोंच्या संख्येने प्रवासी प्रवास करतात. या बसेसशी अनेक मुंबईकरांच्या भावना जोडल्या गेल्या आहेत. मात्र आता बीएस 6 उत्सर्जन मापदंड पूर्ण होत नसल्याने बेस्टने या जुन्या बसगाड्या बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. एका अहवालानुसार बेस्ट या आयकॉनिक डबल डेकर बसेसचा लिलाव करणार आहे.
1937 पासून मुंबईमध्ये डबल डेकर बस सुरू आहेत. सध्या बेस्ट मुंबईच्या सात वेगवेगळ्या मार्गांवर डबल डेकर बस चालवित आहे. कंपनीकडे 120 डबल डेकर बस आहेत. त्यापैकी 100 बसेसचा वापर बंद होणार असून त्यांचा लिलाव होणार आहे. ही बातमी एकून नक्कीच अनेक मुंबईकरांना वाईट वाटले असेल, मात्र तसे नाही. मुंबई आपले हे सर्वात मोठे प्रतीक पूर्णतः गमावणार नाही. बेस्ट नव्याने काही प्रगत वैशिष्ट्यांसह 100 नवीन डबल डेकर बस खरेदी करणार आहे.
बेस्ट 2021 मध्ये टप्प्याटप्प्याने मुंबईत 100 नवीन प्रगत डबल डेकर बसेस चालवण्यास प्रारंभ करेल, ही माहिती एनडीटीव्हीने बुधवारी दिली. लंडनमध्ये चालू असलेल्या एईसी रूटमास्टर बसेसच्या आधारे, मुंबईतील जुन्या डबल डेकर बसेस अशोक लेलँड (Ashok Leyland) यांनी बनविल्या होत्या. सध्या ज्या शहरांमध्ये डबल डेकर बसेस चालविल्या जातात अशा शहरांमध्ये मुंबई, कोलकाता, वडोदरा, कोची आणि तिरुअनंतपुरम ही काही शहरे सामील आहेत. (हेही वाचा: Mumbai Police Best Tweets: ट्विटरवर 5 वर्षे झाल्याच्या निमित्ताने मुंबई पोलिसांनी शेअर केले आपले सर्वोत्कृष्ट ट्विट्स, Watch Video)
बेस्टने यापूर्वी डबल-डेकर बसेस चालविणे थांबविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, निषेध आणि लोकांच्या भावना याच्या आड आल्या व कंपनीला अशा बसेसची सेवा सुरू ठेवणे भाग पडले. आता नव्याने ज्या डबल डेकर बस बेस्टच्या ताफ्यामध्ये येतील त्यामध्ये एकाऐवजी दोन दरवाजे, दोन जिने, सीसीटीव्ही कॅमेरे आदींचा समावेश असेल.