Maharashtra Monsoon Update: मे महिना संपून जून महिना सुरु झाला की, उन्हाची काहीली काहीशी कमी होते. आकाशात ढग जमायला सुरु होतात. वातावरणात एक वेगळाच बदल पाहायला मिळतो. ही चाहूल असते मान्सून (Monsoon Update) दाखल होण्याची. भारतात मान्सून केरळ (Kerala) मार्गे दाखल होतो. पुढे तो महाराष्ट्र आणि देशभरातील इतर राज्यांमध्ये दाखल होतो. यंदाही मान्सून पुढच्या अवघ्या चार दिवसांमध्ये केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. यंदाचा मान्सून सर्वसाधारण सामान्य राहण्याची शक्यता, असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, यंदा मान्सूनचा मुक्काम जून ते सप्टेंबर या काळात मान्सूनचा जोर सर्वोच्च राहील. या कालावधीत देशभरात 96% इतका पाऊस पडेल.
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुढच्या दोन दिवसांमध्ये राज्यात अवकाळी पाऊस (Maharashtra Unseasonal Rain) बरसण्याची चिन्हे आहेत. अवकाळी पाऊस पडल्यावर राज्यातील तापमान पुढचे दोन-तीन दिवस 2-4 अंश सेल्सिअसनं वाढण्याची शक्यता आहे. दरम्यानच्या काळात साधारण 4 जूनपर्यंत केरळमध्ये दाखल होईल. त्यानंतर साधारण जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून मुंबईत मान्सूनपूर्व पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने म्हटले आहे की पुढचे चार ते पाच दिवसांमध्ये महाराष्ट्रात विविध ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने वर्तवलेला हवामानाचा जिल्हानिहाय अंदाज आपण खालील ट्विटवर क्लिक करुन वाचू शकता. (हेही वाचा, Pre-Monsoon Rainfall: मान्सूनपूर्व पाऊस का पडतो? मान्सूनच्या पावसापेक्षा तो कसा वेगळा आहे? जाणून घ्या)
ट्विट
2-3 दिवसांत महाराष्ट्राच्या काही भागांत काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.येत्या 5 दिवसांत आपेक्षित तीव्र हवामानाचा इशारा. तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया https://t.co/jw7yrf9chD…… भेट द्यI pic.twitter.com/96iH8CJPUU
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) May 29, 2023
राज्यात दाखल होणाऱ्या मान्सूनच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील महत्त्वाच्या विभागांच्या बैठका बोलावल्या आहेत. या बैठकांमध्ये मान्सूनच्या संभाव्य पावसाची आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीच्या नियोजनावर चर्चा करण्यात येणार आहे. खास करुन राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, कोकण आपत्ती सौम्यकरण प्रकल्पाची बैठक, मान्सून पूर्व तयारी आढावा बैठक अशा विविध विषयांवरील बैठकांचा धडाका सह्याद्री अतिथीगृह येथे असणार आहे.