Monsoon 2022 | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

राज्याच्या विविध भागात मान्सूनपूर्व पावसाने (Pre-Monsoon Rain) दमदार हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी वादळी वारा, ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडला. दरम्यान, मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावण्यापाठोपाठ प्रत्यक्ष मान्सूनही महाराष्ट्रात लवकरच हजेरी लावणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यात येत्या 24 तासात मान्सून (Monsoon 2022 in Maharashtra) कोकणात दाखल होईल. सध्या मान्सून कर्नाटक आणि महाराष्ट्राबाहेरच रेंगाळला आहे. त्यामुळे राज्याला मान्सूनची जोरदार आस लागून राहिली आहे.

मान्सूनपूर्व पाऊस दमदार पडत असला तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करु नये. मान्सून लांबला तर बियाण्यांवर केलेला खर्च आणि मशागत वाया जाईल, असे राज्याच्या कृषी मंंत्रालयाने आगोदरच सांगितले आहे. परिणामी मान्सूनचे दमदार आगमण होण्याचे वाट शेतकरी पाहात आहे. महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन कोकणातून होते. कोकणात मान्सून दाखल झाला की पुढच्या चार दिवसांमध्येच उर्वरीत महाराष्ट्रात पोहोचतो. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार नैऋत्य मान्सून वारे पुढे सरकत आहे. पुढच्या 48 तासात नैऋत्य मान्सून वाऱ्यासोबत मान्सून तळकोकणात दाखल होईल. (हेही वाचा, Monsoon 2022: मान्सून आगमन लांबणीवर? पाऊस रेंगाळला गोव्याच्या सीमेवर, महाराष्ट्रात दाखल होण्याबाबत आता नवा मुहूर्त, घ्या जाणून)

दरम्यान, मान्सूनपूर्व पवसामुळे उन्हांच्या झळा आणि उकाड्याने होणारी काहीली काहीशी कमी झाली आहे. परंतू, राज्यात अद्यापही काही ठिकाणी उष्णतेची लाट कायम आहे. पुढच्या चार दिवसांत पश्चिम महारष्ट्र आणि मराठवाड्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे. हा पाऊस पडल्यानंतर उष्णतेची लाट काहशी कमी होऊ शकेल, असे हवामान विभागाने म्हटले आहे.

राज्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह दमदार पाऊस

राज्यात मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली. प्रामुख्याने औरंगाबाद, नाशिक, कोकण, मुंबई अशा अनेक ठिकाणी दमदार पाऊस पाहायला मिळाला. औरंगाबाद शहर आणि ग्रामिण भागात वादळी पावसाने अक्षरश: झोडपून काढले. वादळी वाऱ्याने अनेक ठिकाणी घरांचे छत उडाले. झाडे उन्मळली. नाशिक जिल्ह्यातील चांदवड परिसरात पाऊस आणि वारा एकत्र आल्याने उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले. चांदवडमध्ये काही ठिकाणी गारपीटीचा तडाखा बसला. कोकणातही कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्ग, कणकवली भागात मान्सून पूर्व पावसानं दमदार हजेरी लावली.