Monsoon 2022: मान्सून केरळमध्ये दाखल, यंदा तीन दिवस आगोदरच एण्ट्री,  महाराष्ट्रात केव्हा धडकणार? घ्या जाणून
Monsoon | Image Used For Representational purpose Only (Photo Credits: Pixabay.com)

उन्हाच्या झळांनी वैतागलेल्या आणि पवासाची चातकासारखी वाट पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मान्सून केरळच्या (Monsoon 2022 in Kerala) सीमेवर धडकला आहे. विशेष म्हणजे यंदा मान्सून (Monsoon 2022) तीन दिवस आगोदरच पोहोचला आहे. भारतीय हवामान विभागाने याबबत माहितीही दिली आहे. महाराष्ट्रामध्येही मान्सून यंदा लवकरच दाखल होणे अपेक्षीत आहे. पुढच्या सात दिवसांमध्ये मान्सून तळकोकणात दाखल होईल, असा अंदाज आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, 29 मे रोजी मान्सून केरळमध्ये (Kerala) पोहोचला आहे. खरे तर मान्सूनची सुरुवात साधारण एक जूनपासून होते मात्र यंदा मे महिन्याच्या शेवटच्या काही दिवसांमध्येच मान्सून दाखल झाला आहे. मान्सूनला भारताच्या कृषी अर्थव्यवस्थेचा जनक मानले जाते.

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजात म्हटले आहे की, साधारण चार ते पाच जून दरम्यान, मान्सून तळकोकणात दाखल होईल. मान्सूनचे आगमन कोकणात होताच तो मुंबई, पुणे अन्य ठिकाणी बरसणार आहे. पहिले दोन आठवडे मान्सूनचा वेग काहीसा मंदावेल. म्हणजेच जूनच्या पहिल्या दोन आठवड्यांमध्ये मान्सून काहीसा धिमा राहील. त्यानंतर तो गती धारण करेल. दरम्यान, राज्यातील विविध ठिकाणी मान्सूनपूर्व पावसानेही यंदा दमदार हजेरी लावली आहे. (हेही वाचा, Maharashtra Weather Forecast: 5 जून पर्यंत महाराष्ट्रात मोसमी पाऊस पोहचण्याचा IMD चा अंदाज)

हवामान विभागाचे महानिदेशक मृत्युंजय महापात्रा यांनी म्हटले की, दक्षिण-पश्चिम मान्सून 1 जूनपासून सुरु होतो. मान्सून सुरु होण्याची ती सर्वसाधारण तारीख आहे. त्या तुलनेत यंदा मान्सून 29 मे पासूनच दाखल झाला आहे. त्या आधी हवामान विभागाने बंगालच्या खाडीत आलेल्या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर 27 मे पूर्वीच मान्सून दाखल होईल असा अंदाज 15 दिवसांपूर्वीच वर्तवला होता.