कोरोना संकटकाळामध्ये मोबाईल आणि इंटरनेट हेच अनेक विद्यार्थ्यांसाठी केवळ शिक्षणाचे माध्यम राहिले होते. पण आता काळ सरला आहे. सतत हातामध्ये असणारा मोबाईल किशोरवयीन मुलांसाठी व्यसन बनू नये म्हणून एका गावाने चक्क मोबाईल बंदीचा निर्णय घेतला आहे. यवतमाळ (Yawatmal) मधील पुसद (Pusad) तालुक्यातील बान्सी (Bansi Grampanchayat) ग्रामपंचायतीकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. अशाप्रकारे ग्रामसभेत निर्णय घेऊन मोबाईल बंदी (Mobile Phone Ban) करणारं हे पहिलंच गाव आहे.
11 नोव्हेंबर दिवशी बान्सी मध्ये पार पडलेल्या ग्रामसभेमध्ये किशोरवयीन मुलांना म्हणजे 18 वर्षांखालील मुलांना गावात मोबाईल वापरावर बंदी घालण्यात आली आहे. किशोरावस्थेमध्ये हातात सतत मोबाईल असण्यामुळे त्यांना वाईट सवयी जडू शकतात. चूकीच्या वेबसाईट पाहण्याचं व्यसन, मोबाईल वर खेळ खेळण्याचे व्यसन हे त्यांच्या आरोग्यावर चूकीचे परिणाम करू शकतात. हा धोका ओळखून त्यांनी मुलांना मोबाईल पासून लांब ठेवण्याकरिता हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
बान्सी मध्ये 18 वर्षांखालील मुलांना मोबाईल बंदी सोबतच 100% कर भरणाऱ्या नागरिकांसाठी प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना लागू करणे, निराधार लोकांसाठी वृद्धाश्रम ही संकल्पना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे देखील नक्की वाचा: Nagpur Shocker: मोबाईल देण्यास नकार दिल्याने अल्पवयीन मुलाकडून 23 वर्षीय मित्राची हत्या.
मोबाईल फोन वर अनेक गेम्स ऑनलाईन खेळण्याच्या नादामध्ये अनेकांनी जीव गमावल्याचा, आपल्या आईवडिलांचा त्यांनी मोबाईल न दिल्याने जीव घेतल्याच्या घटना ताज्या आहेत. अशावेळी या व्यसनापासून मुलांना लांब ठेवण्याच्या उद्देशाने घेण्यात आलेल्या बान्सी ग्रामपंचायतीचा हा निर्णय स्तुतीस पात्र ठरत आहे. अन्न, वस्त्र,निवारा नंतर आता मोबाईल ही प्रत्येकाची गरज बनत चालली आहे पण त्याचा अतिरेकही धोकादायक आहे हे ओळखणं गरजेचे आहे.