लहान मुलांमध्ये वाढत असलेले मोबाईलचे व्यसन यावर नेहमीच चिंता व्यक्त होते आहे. पण मोबाईल वापरत, हाताळत असताना अपघात होण्याच्याही घटना घडू लागल्या आहेत. बीड जिल्ह्यातील अमला येथे अशीच एक धक्कादायक घटना घडली. खेळताना मोबाईल स्फोट (Mobile Blast in Beed) होऊन एका अल्पवयीन मुलाचा चेहरा जळाल्याची घटना घडली आहे. पीडित मुलगा केवळ सात वर्षांचा आहे. हा प्रकार धारुर येथे 30 जुलै रोजी घडला. या घटनेमुळे पालक आणि नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. तसेच, मुलांना मोबाईल देणे किती धक्कादायक असू शकते, याबाबत पुन्हा एकदा नव्याने चर्चा सुरु झाली आहे.
बाळासाहेब सोळंखे हे कामासाठी मुंबईला असतात. मात्र, त्यांचे कुटुंबीय आणि मुले बीड येथील अमला येथे राहतात. कुटुंबीयांसाठी त्यांनी एक घर भाडेतत्त्वावर घेतले आहे. बाळासाहेब सोळंखे हे पनवेल बस आगारात कामाला आहेत. त्यांना सात वर्षांचा अनिकेत नावाचा मुलगा आहे. हाच अनिकेत 30 जुलै रोजी घरातील बंद पडलेल्या मोबाईल सोबत खेळत होता. दरम्यान, मोबाईल स्फोट झाला. ज्यामुळे अनिकेतचा चेहरा भाजला. इयत्ता दुसरीत शिकत असलेला अनिकेत या घटनेत गंभीर भाजला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, मोबाईलमुळे अनिकेत आणि त्याचा आजूबाजूच्या कपड्यांनाही काही प्रमाणात आग लागली. मात्र, प्रसंगावधान राखत आईने ती आटोक्यात आणली. एबीपी माझा वृत्तवाहिनीने याबाबत वृत्त दिले आहे.
मोबाईल स्फोट होण्याची ही पहिलीच वेळ नाही. या आधीही अशा अनेक घटना घडल्या आहेत. ज्यामध्ये नागरिकांच्या शरीराचे वेगवेगळे अवयव भाजले आहेत. काही ठिकाणी लक्षवेधी अशा मोठ्या घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे लहान मुलांच्या हातात मोबाईल देताना पालकांनी विचार करावा. तसेच, मोठ्या माणसांनीही मोबाईल वापरताना आवश्यक आणि योग्य ती काळजी घ्यावी. जेणेकरुन दुर्घटनेला सामोरे जावे लागणार नाही. शिवाय, मोबाईल खरेदी करताना त्याची सर्व बाजूनी पाहणी करुन योग्य ब्रँडचाच मोबाईल खरेदी करावा. ज्या ब्रँडने सुरक्षेची सर्व मानके पूर्ण केली आहेत, अशाच मोबाईलची खरेदी करावी, असे अवाहन तज्ज्ञ करतात.