कोविड रुग्णालयातील परिचारिकांच्या प्रश्नावर आंदोलन केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांना जामीन मंजूर झाला आहे. त्यामुळे मनसेला मोठा दिलासा मिळाला आहे. वसई पालिका आयुक्त दालन आंदोलन प्रकरणी मनसे नेते अविनाश जाधव यांना आधी तडीपारीची नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर ठाण्याच्या खंडणीविरोधी विभागाने जाधव यांना 31 जुलै रोजी अटक केली होती. तसेच ठाणे दिवाणी न्यायालयात त्यांचा जामीन अर्ज सोमवारी फेटाळण्यात आला होता. मात्र, आज ठाणे सत्र न्यायालयाने अविनाश जाधव यांना 15 हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे.
कोरोनाच्या काळात ठाणे महापालिकेने काही परिचारिकांना नियुक्त केले होते. त्यानंतर ठेकेदाराच्या माध्यमातून काम करण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला जात होता. त्याविरोधात जाधव यांच्या नेतृत्वाखाली मनसैनिकांनी महापालिकेच्या बाळकूम येथील कोव्हिड रुग्णालयासमोर आंदोलन केले होते. त्या आंदोलनानंतर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी जाधव यांना अटक झाली होती. अटकेनंतर जाधव यांनी ठाणे दिवाणी न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, पोलिसांनी अधिक वेळ मागितल्याने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. आज दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यानंतर मनसे सैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. हे देखील वाचा- सीएम उद्धव ठाकरे व मंत्री आदित्य ठाकरे यांच्या विरोधात सोशल मिडियावर आक्षेपार्ह पोस्ट; नवी मुंबई येथील महिलेविरुद्ध गुन्हा दाखल
अविनाश जाधव यांना पुढील दोन वर्षांसाठी मुंबई, ठाणे, ठाणे ग्रामीण, नवी मुंबई आणि रायगड या पाच जिल्ह्यांमधून हद्दपार करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. त्यानंतर अविनाश जाधवांना सोमवारी ठाणे न्यायालयात हजर करण्यात आले होते. तेव्हा ठाणे सत्र न्यायालयाच्या परिसरात मनसे कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती. तसेच मनसैनिकांनी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला होता.