मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे सांताक्रूझ (Santacruz) येथील पटेल नगरात काही दिवासांपूर्वी दोन जणांना विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. तसेच या भागातील नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने वीजेपुरवठा सुद्धा बंद करण्यात आला होता. या सर्व प्रकारानंतर मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर (Vishwanath Mahadeshwar) यांनी घटनास्थळी भेट दिली. मात्र तेथील स्थानिकांनी महाडेश्वर यांच्यावर संताप व्यक्त केला. त्याचसोबत नागरिकांनी त्यांना घेरत विविध प्रश्न विचारण्यास सुरुवात केली असता माझ्या सोबत दादागिरी करु नका असे बोलतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. तसेच तेथील एका महिलेसोबत कथित रुपात हात मुरगळल्याचे व्हिडिओतून दिसून आले होते.
या प्रकारावर आता मनसे सरचिटणीस शालिनी ठाकरे (Shalini Thackeray) यांनी महाडेश्वर यांच्या उद्धट वागण्यावर जहरी टीका केली आहे. शालिनी ठाकरे यांनी एक ट्वीट करत महापौरांना एक पत्र लिहिले आहे. या पत्राच्या विषयाला जनाची नाही तर मनाची लाज बाळगून महापौरपदाचा राजीनामा देण्याबाबत असे म्हटले आहे. त्याचसोबत पत्रात त्यांनी एका तरुणीचा हात पकडून मुरगळ्याचे कृत्य जे तुम्ही केले असून त्याचा व्हिडिओ पाहून महाराष्ट्रीय माणसाची मान खाली गेल्याची टीका महाडेश्वर यांच्यावर केली आहे.(मुंबई महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचे महिलांसोबत कथित गैरवर्तन, व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल Watch Video)
'जनाची नाही तर मनाची लाज बाळगून' तुम्ही तत्काळ महापौरपदाचा राजीनामा द्यावा आणि महापौरपदाचा उरला-सुरला मान जपावा, ही तुमच्याकडे 'शेवटची मागणी' ! @mnsadhikrut pic.twitter.com/MzIUPqExKW
— Shalini Thackeray (@ThakareShalini) August 8, 2019
तसेच महाडेश्वर तुमच्यावर 354 अंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल करुन कठोर कारवाई करण्याची मागणी मुंबई पोलिस आयुक्तांकडे करणार असल्याचे ही शालिनी ठाकरे यांनी म्हटले आहे. एवढेच नाही तर राज्य महिला आयोगाकडे सुद्धा तुमच्याविरोधात सदर पुराव्यांसह दाद मागितली जाणार आहे. परंतु हे सर्व करताना मुंबईच्या महापौर पदाची शान धुळीला मिळणार असल्याची खंत शालिनी ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.