Raj Thackeray: औरंगाबाद येथील सभेपूर्वी राज ठाकरे यांना पुण्यातील पुरोहितांकडून वेदांमधील मंत्रोच्चाराद्वारे आशीर्वाद
Raj Thackeray | Photo Credit - Twitter

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या औरंगाबाद (Aurangabad) येथील सभेची प्रसारमाध्यमांतून जोरदार चर्चा सुरु आहे. या सभेसाठी राज ठाकरे मुंबईहून निघाले आहेत. या सभेला जाण्यासाठी राज ठाकरे यांनी पुण्याहून दौराही केला. या वेळी औरंगाबाद येथील सभा निर्विघ्नपणे पार पडावी यासाठी पुण्यातील 100 ते 150 ब्राह्मणांकडून आशीर्वाद देण्यात आला. त्यासाठी चारही वेदांमधील मंत्रोच्चाराद्वाचे पठण झाले. या कार्यक्रमासाठी राजगड येथे सकाळीच ब्रह्मवृंद मोठ्यासंख्येने हजर होता.

राज ठाकरे यांना यश मिळावे. त्यांची सभा निर्विघ्न पार पडावी. त्यांच्या विजयी वाटचालीस सुरुवात व्हावी. या हेतूने पुरोहित वर्गाच्या वतीने आम्ही मंत्रांद्वारे आशीर्वाद देणार आहोत असे गुरुजी मनोज पारगावकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. आमची भूमिका आहे की, राज ठाकरे यांना दीर्घ आयुष्य, आरोग्य, ऐश्वर्य प्राप्त व्हावे यासाठी आम्ही ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद या चारही वेदांमधील मंत्रांचा आशीर्वाद देण्याचे पारगावकर यांनी म्हटले.

दरम्यान, राज ठाकरे यांची औरंगाबादची सभा जाहीर झाल्यापासूनच वादाच्या भोवऱ्यात आहे. कधी या सभेला परवानगी मिळण्यावरुन तर कधी सभेला असलेल्या अटी आणि शर्थींमुळे. शेवटी जोरदार चर्चा रंगल्यानंतर हो..ना.. करत सभेला परवानगी मिळाली. आता या सभेत राज ठाकरे काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, राज ठाकरे यांच्या सभेपूर्वी औरंगाबादचे राजकीय, सामाजिक वातावरण मात्र चांगलेच ढवळून निघाले आहे. (हेही वाचा, MP Imtizay Jalil Invites Raj Thackeray: इम्तियाज जलील यांच्याकडून राज ठाकरे यांना 'इफ्तार पार्टी'चे निमंत्रण )

दुसऱ्या बाजूला, महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे उद्या (1 मे) औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात महाराष्ट्र दिनी राज ठाकरे यांची औरंगाबाद येथील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर जाहीर सभा होत आहे. अलिकडे त्यांनी घेतलेल्या हिंदुत्त्वाच्या भूमिकेवरुन रोजदार चर्चा सुरु आहे. दरम्यान, एमआयएम (AIMIM) खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी राज ठाकरे यांना इफ्तार पार्टीचे निमंत्रण दिले आहे. त्यामुळे राज ठाकरे औरंगाबाद येथील सभेत काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यासोबतच इम्तियाज जलील यांनी दिलेल्या इफ्तार पार्टीला राज ठाकरे उपस्थितीर दर्शवणार का? याबाबतही उत्सुकता आहे.