महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर आज लीलावती रुग्णालयात (Lilavati Hospital) छोटी शस्त्रक्रिया (Surgery) झाली आहे. त्यांना उद्या रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे. डॉ. विनोद अग्रवाल, डॉ आनंद उत्तुरे यांनी ही शस्त्रक्रिया केली आहे. यावेळी डॉ जलील पारकर देखील शस्त्रक्रियेदरम्यान उपस्थित होते. तसचे त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे, मुलगा अमित ठाकरे, मुलगी उर्वशी आणि सून मिताली हे देखील शस्त्रक्रियेदरम्यान उपस्थित होते.
राज ठाकरे यांना काही महिन्यांपूर्वी टेनिस खेळताना हाता सोबतच पाठीवर दुखापत झाली होती. त्यामुळे त्यांच्या पाठीच्या मसल टिशूमध्ये रक्त जमा झाले होते. त्यामुळे होणारा दबाव कमी करण्यासाठी हॅमेटोमा ड्रेनेजची छोटी शस्त्रक्रिया केली गेली आहे. डॉ. जलील पारकर यांच्या अंतर्गत आज सकाळी त्यांना दाखल करण्यात आले होते. आज दुपारी 3 वाजता त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्याची माहिती समोर आली आहे. हे देखील वाचा- उदयनराजे भोसले यांचे लॉकडाऊनच्या निषेधार्थ सातारा येथे ‘भीक मागो आंदोलन’
राज ठाकरे हे शिवाजी पार्क येथील टेनिस क्लबमध्ये दररोज सायंकाळी टेनिस खेळण्यासाठी जात होते. त्यांनी टेनिस खेळण्यासाठी आदित्य नावाच्या एका कोचची देखील नियुक्ती केल्याचे समजत आहे. शिवजीपार्क येथील जिमखाना येथे तास दोन तास टेनिस खेळणे, पहाटे साडेपाच वाजता लवकर उठून एक तास योगासने करणे. त्यानंतर बॉडी स्ट्रेचिंग करणे, असा राज ठाकरे यांचा दिनक्रम असल्याची माहिती मिळत आहे.
राज ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून संवाद साधला होता. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या दुखण्याच्या त्रासाटी माहिती जाणून घेतली होती. तसेच लिलावती रुग्णालयातील काही तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार करून घेण्याचेही सुचवले होते, अशीही माहिती समोर येत आहे.