Raj Thackeray On COVID Norms: राज ठाकरे यांचा कोरोना निर्बंधांवरुन संताप, परप्रांतीय हल्लेखोर फेरिवाल्यांबाबतही वक्तव्य
Raj Thackeray | (Photo Credits: Facebook)

Raj Thackeray On COVID Norms: लॉकडाऊनचा फायदा घेत कोट्यवधी रुपयांची कामं लाटली जात आहे. त्यासाठीच कोरोनाच्या लाटांवर लाटा आणल्या जात आहेत. कधी दुसरी, कधी तिसरी. लाटा यायला हा काही समुद्र आहे का? असा सवाल उपस्थित करत मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी कोरोना निर्बधांबाबत (COVID Norms) संताप व्यक्त केला. राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर या वेळी जोरदार टीकास्त्र सोडले. तसेच, ठाणे येथे परप्रांतीय फेरीवाल्याने शासकीय कर्मचाऱ्यावर केलेल्या हल्याबाबतही तीव्र भावना व्यक्त केल्या. हल्ला करणारा परप्रांतीय फेरीवाला आज पोलिसांच्या ताब्यात आहे. तो बाहेर आला की त्याला आम्ही फटके देऊ. त्यांची हिंमतच कशी होते? त्यांना भीती काय असते हे दाखवून देऊ,असेही राज ठाकरे या वेळी म्हणाले.

राज्य सरकारच्या कोरोना निर्बंधांचे उल्लंघन करत मनेसेने मुंबई आणि ठाणे परिसरात दहीहंडी आयोजित केली. ती दहीहंडी फोडलीही. या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेत राज ठाकरे यांनी मनसेने घेतलेल्या भूमिकेचे समर्थन घेतले. लॉकडाऊनच्या आडून कोट्यवधी रुपयांची कामे केली जात आहेत. दुसऱ्या बाजूला त्या विरोधात कोणी बोलू नये, मोर्चा, सभांचे आयोजन करु नये, यासाठीच कोरोनाचे कारण पूढे करत निर्बध लावले जात आहेत. यापूर्वी देशात कधी रोगराई आली होती की नाही? असा सवालही राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला. (हेही वाचा, Raj Thackeray चा राज्य सरकार वर हल्लाबोल; मंदिरं उघडा अन्यथा घंटनाद आंदोलनाचा इशारा)

राज्यात कोरोना निर्बंध आहेत. मात्र, सर्व काही सुरळीत सुरु आहे. कोठेही काहीही बंद नाही. राजकीय पक्षांचे मेळावे, मोर्चे, जनआशीर्वाद यात्रा वैगेरे सगळं सुरु आहे. शिवेसना आणि नारायण राणे यांच्या लोकांमध्ये जोरदार हाणामाऱ्याही सुरु आहेत. असे सगळे आहे तर मंग केवळ सणांवरच बंधने का? कोरोना केवळ सण, उत्सवांतूनच पसरतो का? असा सवाल राज ठाकर यांनी उपसथित केला आहे. राज्य सरकारला जेवढं आवश्यक आहे तेवढंच सुरु ठेवायचं. इतरांसाठी बाकीचे बंद करुन ठेवायचं असले सगळे उद्योग राज्यात सुरु असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. जर नियम लावायचेच असतील तर सर्वांना सारखे नियम लावा. यांना (सरकारला) घरातून बाहेर पडायची भीती वाटते याला इतरांनी काय करायचे? असा सवालही राज ठाकरे यांनी उपस्थित केला.