Raj Thackera And Uddhav Thackeray | (Photo credit: Archived, edited, representative images)

राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आज पहिले महाअधिवेशन (MNS Maha Adhiveshan) आयोजित करण्यात आले आहे. त्यानिमित्त राज ठाकरे नक्की काय बोलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. तसेच ते पक्षाच्या झेंड्याचे रूप बदलणार असून आज नवीन झेंड्याचे अनावरण देखील करण्यात येणार आहे. हा नवा झेंडा (MNS New Flag) भगव्या रंगाचा असून त्यावर राजमुद्रा असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच राज ठाकरे आपल्या पक्षाची विचारसरणी बदलून ती मराठी भाषिकांपुरतीच मर्यादित न ठेवता आता पक्ष हिंदुत्वाच्या मुद्द्यावर पुढील राजकीय वाटचाल करू शकतो.

आज हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray Jayanti) यांची जयंती असल्याने आजच्याच दिवशी या महाअधिवेशनाचे राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आयोजन केले आहे. मुंबईतील गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये सकाळी 10 वाजता या अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. मनसेच्या या राज्यव्यापी महाअधिवेशनाला राज्यभरातून हजारोंच्या संख्येने पक्षाचे पदाधिकारी आज उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान, मनसेच्या आजच्या महाअधिवेशनाचे पोस्टर्स आज राज्यभर लावण्यात आले असून सर्वच मनसैनिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन पक्षाकडून करण्यात आले आहे.

तर दुरीकडे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त शिवसेनेकडून 'शिवसेना वचनपूर्ती जल्लोष' (Shivsena Vachanpurti Jallosh) सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा जाहीर सत्कार करण्यात येणार आहे.

Balasaheb Thackeray Jayanti 2020: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या बहुआयामी व्यक्तीमत्वाची काही वैशिष्ट्ये

हा कार्यक्रम मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदानात आज पार पडणार आहे. जेव्हापासून शिवसेनेची स्थापना करण्यात आली होती, तेव्हापासून सेनेसोबत असणाऱ्या वरिष्ठ नेत्यांचा या सोहळ्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार होणार आहे.

त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त दोन्ही पक्ष आपापल्या परीने शक्तिप्रदर्शन करणार असं दिसून येत आहे.