राज ठाकरे यांच्या चौकशीनंतर मनसेची ED ला नोटीस; कार्यालयाबाहेरील फलक मराठीमध्ये लावण्याची मागणी
ईडी कार्यालयाबाहेरील फलक (Photo Credit : Twitter)

मुंबई येथील कोहिनूर मिल (Kohinoor Mill) प्रकरणात ईडी (ED) या संस्थेने मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना नोटीस पाठवली होती. त्यानंतर मनसे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले. याबाबत ‘ठाणे बंद’चा इशाराही देण्यात आला होता. अखेर काल राज ठाकरे यांची चौकशी पूर्ण झाली. त्यानंतर आता मनसेने ईडीला नोटीस पाठवली आहे. आपल्या कार्यालयाबाहेरील फलकावरील अक्षरे मराठीमध्येही लिहा याबाबत ही नोटीस पाठवली आहे. या बाबत मनसेसे ट्विट करत माहिती दिली आहे. आज दुपारी ही नोटीस पाठवण्यात आली.

मनसे ट्विट - 

महाराष्ट्र राज्यात विविध बोर्डवरील फलक हे मराठीमध्ये असावेत अशी सक्ती करण्यात येत आहे. ईडी या संस्थेच्या मुंबई कार्यालायावरील फलक हे इंग्रजी आणि हिंदी भाषेत आहेत. त्यामध्ये मराठीही समविष्ट केली जावी म्हणजेच हा फलक मराठीमध्येही असावा याबात ही नोटीस पाठवण्यात आली आहे. याबाबत आधी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती. याआधी मनसेने अनेकवेळा अशाप्रकारचे फलक हे मराठीमध्ये असावेत यासाठी आंदोलने केली होती. (हेही वाचा: कितीही चौकशी करा, तोंड बंद ठेवणार नाही; राज ठाकरे यांनी ईडी चौकशीनंतर दिली पहिली प्रतिक्रिया)

या नोटीसीनंतर ईडीच्या कार्यायाच्या फलकावर ‘सक्तवसुली संचालनायन’ अशी अक्षरे दिसतील का? याबाबत उत्सुकता आहे. दरम्यान, ईडी कार्यालयात काल (गुरुवार, 22 ऑगस्ट 2019) राज ठाकरे यांची तब्बल 8 तास 46 मिनिटे इतकी प्रदीर्घ चौकशी सुरु होती. महाराष्ट्रासह संपूर्ण देशातील प्रसारमाध्यमे आणि नागरिकांना या चौकशीतून काय बाहेर येते याबाबत उत्सुकता होती. चौकशीनंतर राज ठाकरे यांनी ‘माझी कितीही चौकशी करा, तोंड बंद ठेवणार नाही’ अशी प्रतिक्रिया कार्यकर्त्यांना दिली आहे.