कोहिनूर मिल (Kohinoor Mill) प्रकरणी आज ईडी (ED) कार्यालयात राज ठाकरे (Raj Thackeray) चौकशीसाठी उपस्थित राहिले होते. तब्बल साडे आठ तासाच्या चौकशीनंतर राज ठाकरे हे ईडीच्या कार्यालयाबाहेर आले. त्यानंतर राज ठाकरे सहकुटुंबासह कृष्णकुंजकडे निघाले. निवासस्थानी पोहचताच त्यांनी आजच्या चौकशी नंतर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यावेळी राज ठाकरे यांनी माझी कितीही चौकशी करा, तोंड बंद ठेवणार नाही अशी प्रतिक्रिया कार्यकर्त्यांना दिली आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी कृष्णकुंजच्या बाहेर प्रचंड गर्दी झाली होती. तसेच राज ठाकरे घरी परतल्यानंतर कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला.
राज ठाकरे यांना 'कोहिनुर स्क्वेअर' (Kohinoor Square) प्रकरणात काही दिवसांपूर्वीच ईडीची नोटीस आली होती. या नोटीशीला प्रतिसाद देत राज ठाकरे आज (22 ऑगस्ट 20198) ईडी कार्यालयात दाखल झाले. राज ठाकरे यांच्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना कार्यकर्त्यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या होत्या. दरम्यान, मनसे कार्यकर्त्यांची खदखद आणि संतप्त भावना विचारात घेता कोणताही अनुचीत प्रकार घडू नये. यासाठी मुंबई पोलिसांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना नोटीसा पाठवल्या होत्या. तसेच, ईडी कार्यालय परिसरात जमावबंदी आदेश लागू केला होता. दरम्यान, मुंबई पोलिसांनी मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांना ताब्यातही घेतले.(Kohinoor Mills Case: सक्तवसुली संचालनालय अधिकाऱ्यांकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तब्बल 8 तास 46 मनिटे चौकशी)
दरम्यान, मायानगरी मुंबईतील मध्यवर्थी असलेल्या दादर परिसरात 'कोहिनुर स्क्वेअर' या भव्य प्रकल्पातील गैरव्यवहाराप्रकरणी ईडीने राज ठाकरे कोहिनुर समूहाचे उन्मेष जोशी व राज यांचे भागीदार राजन शिरोडकर यांना नोटीस बजावली. या नोटीशीनंतर ईडीने उन्मेष जोशी यांची सोमवारी (19 ऑगस्ट 2019) सखोल चौकशी केली. ही चौकशी सुमारे साडेसात तास सुरु होती. जोशी यांची चौकशी मंगळवारी (20 ऑगस्ट 2019) रोजीही ही चौकशी सुरु होती. मंगळवारच्या चौकशीत उन्मेष जोशी यांच्यासोबत राजन शिरोडकरही उपस्थित होते. दरम्यान, राज ठाकरे यांना चौकशीसाठी ईडीने 22 ऑगस्ट ही तारीख दिली होती. त्यामुळे राज ठाकरे हे आज ( 22 ऑगस्ट) ईडीच्या कार्यालयात चौकशीला सामोरे गेले.