Nitin Raut (Photo Credit: ANI)

लॉकडाऊनच्या काळात वाढीव वीज दरावरून रस्त्यावर उतरून आंदोलन करणारी मनसे पुन्हा आक्रमक झाली आहे. मंगळवार (26 जानेवारी) दिवशी मनसे ने दादरच्या शिवाजी पार्क पोलिस स्टेशनमध्ये राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत (Energy Minister Nitin Raut), Energy Secretary आणि Best General Manager यांच्या विरोधात वीजा दरात सवलत देण्याचं वचन न पाळल्याने तक्रार दाखल केली आहे. लॉकडाऊनमध्ये अनेकांना वीजेचं बील भरमसाठ आल्याने त्यांनी तक्रार केली होती. यावरून मनसेने 'खळ्ळ खट्याक' स्टाईल मध्ये आंदोलन देखील केले होते.

मनसेचे यशवंत किल्लेदार यांनी शिवाजी पार्क पोलिस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवली आहे. अनेक आंदोलनं आणि पत्र, निवेदनं देऊनही उर्जामंत्री नितीन राऊत यांनी ग्राहकांना वीज बीलात सवलत दिलेली नाही. त्यांनी पूर्ण वीज बिल भरण्याचं आवाहन केलं आहे. त्यामुळे आता उर्जामंत्री नितीन राऊत, Energy Secretary आणि Best General Manager यांच्या विरोधात तक्रार केल्याची माहिती किल्लेदार यांनी दिली आहे.

दरम्यान मनसेच्या संदीप देशपांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आता राज्यभर मनसैनिकांना स्थानिक पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवण्यास सांगितलं आहे. मनसेने यापूर्वी राज्यव्यापी आंदोलन केले आहे. त्यामध्ये वीज दरात सवलत मिळावी अशी आग्रहाची मागणी होती. मात्र आता MSEDCL ने वीज दरात सवलत दिलेली नाही. पण जर ग्राहकांनी बिल भरलं नाही तर त्यांची वीज कापण्याचेही आदेश दिल्याचं HT चं वृत्त आहे.