Sandeep Deshpande and CM Uddhav Thackeray (Photo Credits: Facebook)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी काल (22 नोव्हेंबर) व्हिडिओ कॉन्फरन्सच्या (Video Conference) माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विशेष अशी काही घोषणा केली नाही. केवळ कोरोनाच्या सद्य स्थितीवर नजर टाकत अनलॉकमध्ये जनतेने सावध राहण्याचे आवाहन केले. मात्र या चर्चेत मुख्यमंत्री अनेक महत्त्वांच्या विषयांवर बोलतील. राज्य सरकारची पुढची रुपरेषा काय असेल याबाबत सांगतील. मात्र तसे काहीच झाले नाही. त्यामुळे आपला मुख्यमंत्री हे आपले दुर्देव असल्याची टिका मनसे नेते संदिप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून केली आहे. त्यांनी याबाबतचे ट्विट केले आहे.

"मुख्यमंत्र्यांकडून काही अपेक्षा नसल्याने कालच्या मुख्यमंत्र्याच्या भाषणाने अपेक्षाभंग झाला नाही. आपला मुख्यमंत्री, आपले नशीब, आपले दुर्दैव, आपली जबाबदारी" असा टोला संदिप देशपांडे यांनी उद्धव ठाकरेंना आणि एकूण राज्य सरकारला लगावला आहे.

वाढीव वीजबिल, कोरोनाची स्थिती आटोक्यात कधी येणार, सर्व सुरळीत कधी सुरु होणार यांसारखे अनेक प्रश्न जनतेला पडले होते. मात्र मुख्यमंत्र्यांनी त्याकडे कानाडोळा करत अगदी सर्वसामान्य माहिती जनतेला दिली. त्यामुळे जनतेची घोर निराशा झाली असा सूर विरोधकांकडूनही ऐकायला मिळत आहे. हेदेखील वाचा- महाराष्ट्र: वाढीव वीज बिलवाढीविरोधात आज भाजपचे राज्यव्यापी आंदोलन, मनसेकडून दादर मध्ये पोस्टर लावून आक्रमक आंदोलनाचे संकेत

दरम्यान गेल्या काही काळापासून सामान्य जनता आपली अनेक गा-हाणी घेऊन मनसे प्रमुख राज ठाकरे यांना कृष्णकुंजवर भेटायला येत आहे. त्यामुळे राजसाहेबांवरचा जनतेचा विश्वास वाढत असल्याचे चित्र उभे राहिले आहे. यावरुनच 'अनेक समस्यावंर एकच उपाय' म्हणत मनसे नेते संदीप देशपांडे (MNS Leader Sandeep Deshpande) यांनी राज्य सरकारवर टोला लगावला होता. त्याचबरोबर महाराष्ट्राचे नवीन मंत्रालय म्हणत त्यांनी चक्क कृष्णकुंजचा पत्ता ट्विटच्या माध्यमातून शेअर केला आहे.मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विटमध्ये लिहिले की, "समस्या अनेक उपाय एक. महाराष्ट्राच्या मंत्रालयाचा नवीन पत्ता "श्री राजसाहेब ठाकरे कृष्णकुंज शिवाजी पार्क दादर मुंबई 28."

एकूणच ठाकरे सरकारवर विरोधक जोरदार टिका करत असून त्याचाच एक भाग म्हणून वीजबिलवाढीविरोधात आज भाजपने राज्यव्यापी आंदोलन छेडले आहे.