'विचार महाराष्ट्र धर्माचा ! निर्धार हिंदवी स्वराज्याचा !' मनसे चे हिंदुत्वावर आधारित नवे पोस्टर लाँच
MNS Poster (Photo Credits: Twitter)

राज ठाकरे यांचा पक्ष लवकरच आपल्या झेंड्याचा रंग बदलणार अशा चर्चा मागील काही दिवसांपासून समोर येत आहेत. परंतु, त्यासंबंधित अद्याप तरी कोणतीही अधिकृत घोषणा झाली नसली तरी मनसे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर यापुढे वाटचाल करणार हे मात्र खरंय असं दिसत आहे. कारण मनसे ने आपल्या नवीन पोस्टर अनेक ठिकाणी लावत पोस्टरबाजीला सुरुवात केली आहे. आणि विशेष म्हणजे या पोस्टरवर हिंदुत्वाचा मुद्दा प्रकर्षाने दिसून येत आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी आज ट्विट करत एक नवे पोस्टर शेअर केले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राज्यव्यापी अधिवेशनासाठी हे पोस्टर छापण्यात आले आहे. त्यावर राज ठाकरे यांचं फोटो असून, हिंदुत्वार आधारित एक ब्रीदवाक्य लिहिण्यात आले आहे. 'विचार महाराष्ट्र धर्माचा ! निर्धार हिंदवी स्वराज्याचा !' असं या पोस्टरवर लिहिलेले आपल्याला पाहायला मिळते. तसेच हे अधिवेशन कुठे आणि कधी होणार याची माहिती देखील आपल्याला या पोस्टरवर पाहायला मिळते.

तर दुसरे पोस्टर दादर येथील शिवसेना भवन समोर लावण्यात आले होते. 'सत्तेसाठी सतराशे साठ, महाराष्ट्र धर्मासाठी एकच सम्राट' असे या पोस्टरवर लिहिलेले पाहायला मिळते.

'सत्तेसाठी सतराशे साठ महाराष्ट्र धर्मासाठी एकच सम्राट'; राज ठाकरे यांच्या छायाचित्रासह शिवसेना भवनसमोर मनसेची पोस्टरबाजी

दरम्यान, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त म्हणजेच 23 जानेवारी रोजी  मनसेचं पहिलं अधिवेशन गोरेगाव येथील नॅस्को मैदानावर आहे. या अधिवेशनाला राज्यभरातून मोठ्या संख्येने मनसैनिक हजेरी लावणार असून इथेच मनसेच्या नव्या धोरणाबाबत व नव्या झेंडयाबाबत राज ठाकरे स्वतः घोषणा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे हिंदुत्वाचा मुद्दा घेत मनसे आता भाजपसोबत तर हातमिळवणी करणार नाही ना हे बघणं महत्त्वाचं ठरेल.