MNS poster in front of Shiv Sena Bhavan In Mumbai

‘सत्तेसाठी सतराशे साठ, महाराष्ट्र धर्मासाठी एकच सम्राट’ (Maharashtra Dharma Samrat) असे लिहिलेले पोस्टर शिवसेना भवन (Shiv Sena Bhavan) परिसरात लागली आहेत. ही पोस्टर्स महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) कार्यकर्त्यांनी ही पोस्टर्स लावल्याचे सांगितले जात आहे. येत्या 23 जानेवारी या दिवशी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Bal Thackeray) यांची जयंती आहे. त्याच दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले आहे. त्या अनुषंघानेच ही पोस्टर्स झळकल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे ही सर्व पोस्टर्स भगव्या रंगात रंगलेली असल्याने येत्या काळात मनसे आणि भाजप संभाव्य युतीचे हे संकेत तर नाहीत ना? असा प्रश्न उपस्थीत केला जात आहे.

या पोस्टर्ससंदर्भात मनसे सरचिटणीसांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, राज ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे महाराष्ट्रावर जेव्हा जेव्हा संकट आले आहे तेव्हा नेहमीच ठामपणे पाठिशी उभे राहिले आहेत. मग तो गोविंदा, गणेशोत्सव असो किंवा रजा अकादमीच्या गुंडांनी घातलेला दंगा. मनसे महाराष्ट्राच्या पाठीशी आहे हा संदेश देण्याचाच प्रयत्न आम्ही या पोस्टर्सच्या माध्यमातून केला असल्याचे मनसेने म्हटले आहे. तसेच कोणालाही डिवचण्यासाठी ही पोस्टर्स आपण लावली नाहीत तर, केवळ आपली भूमिका मांडण्यासाठीच आपण ही पोस्टर्स लगावली असल्याचे सांगायलाही मनसे विसरली नाही. (हेही वाचा, 'संजय राऊत एक नंबरचे फेकाडे,' मनसे कार्यकर्त्यांवर केलेल्या आरोपाला संदीप देशपांडे यांचे उत्तर)

दरम्यान, आम्ही नेहमीच महाराष्ट्र धर्म पाळला आहे. पाळत आहोत. परंतू, सत्तेसाठी सगळे येत आहेत पण त्यांच्याकडून महाराष्ट्र धर्माचे पालन होताना मात्र दिसत नाही. सध्याचे महाविकास आघाडी सरकार म्हणजे तर बोलाचाच भात अन बोलाचीच कडी असा टोलाही मनसेने विद्यमान राज्य सरकारला लगावला आहे. दरम्यान, मनसेच्या झेंड्याचा रंग बदलणार असल्याची चर्चा आहे. यावर विचारले असता झेंड्याचा रंग बदलण्याचा निर्णय अद्यापतरी झाला नसल्याचे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे.