मंत्री ऐकत नाहीत? त्यांना कांद्याने हाणा! राज ठाकरे यांचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सल्ला
राज ठाकरे यांचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अजब सल्ला | (Photo courtesy: Archived, Edited Images)

सध्या नाशिक (Nashik) दौऱ्यावर असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS chief Raj Thackeray) यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना (Onion Productive Farmers) एक भलताच सल्ला दिला आहे. अडचणीत असलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी राज ठाकरे यांची भेट गेतली. या वेळी त्यांनी मंत्री आपले ऐकत नसल्याचे राज यांना सांगितले. यावर राज यांनी, तुमच्या मागण्या मंत्री जर ऐकत नसतील तर त्यांना कांदे फेकून मारा, असा सल्ला दिला. राज ठाकरे आपल्या आक्रमक भाषाशैलीसाठी प्रसिद्ध आहेत. यापूर्वीही त्यांनी आपल्या जाहीर भाषणांतूनही कार्यकर्त्यांना असे सल्ले दिले आहेत. आपल्या खास शैलीत त्यांनी आता शेतकऱ्यांनाही सल्ला दिला आहे खरा. पण, हा सल्ला शेतकरी खरोखरच अंमलात आणणार का? याबाबत उत्सुकता आहे.

कांदा उत्पादक शेतकरी आणि राज ठाकरे यांची नाशिक येथील कळवणमध्ये भेट झाली. या वेळी स्वाभिमानी संघटनेचे पदाधिकारीही उपस्थित होते. या भेटीत राज यांनी शेतकऱ्यांशी दीर्घकाळ संवाद साधला. महत्त्वाचे म्हणजे राज यांच्या नाशिक दौऱ्यास जनतेतून चांगला प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. अगदी आज (बुधवार, 19 डिसेंबर) सकाळीही राज ठाकरे जेव्हा दिंडोरी भागात आले तेव्हा, नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. गर्दी इतकी तुफान होती की, त्यांना गाडीतूनही खाली उतरणे कठीण झाले. अखेर गर्दीला पांगवण्यासाठी पोलीसांना हस्तक्षेप करावा लागला. (हेही वाचा,1064 रुपयांची शेतकऱ्याची मनीऑर्डर पंतप्रधान कार्यालयाकडून परत )

दरम्यान, राज ठाकरे हे कालपासून (मंगळवार, 18 डिसेंबर) नाशिक दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याला नागरिक आणि कार्यकर्त्यांकडून मोठा प्रतिसाद मिळत असला तरी, त्याचा पक्षाला निवडणुकीसाठी किती फायदा होतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. पक्ष स्थापनेपासूनच नाशिक हा राज ठाकरे यांच्यासाठी जिव्हाळ्याचा विषय राहिला आहे. नाशिककरांनी राज ठाकरे यांच्यावर प्रेम दाखवत महापालिकेची सत्ताही मनसेच्या हाती दिली. मात्र, विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या महापालिका निवडणुकीत पक्षातील फुटाफुटीचा राज यांच्या मनसेला चांगलाच फटका बसला. अनेक नगरसेवक पक्षांतर करुन भाजपवासी झाले. त्यामुळे नाशिक राज यांच्या हातून निसटले. प्रदीर्घ काळानंतर राज ठाकरे नाशिकमध्ये सत्तावापसी करण्याचा प्रयत्न करत आहेत.