विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंड व्हायला आता काही तासच शिल्लक राहिले असून सर्व राजकीय पक्षांच्या प्रचार सभा अंतिम टप्प्यात आल्या आहेत. यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पुण्यात कोथरूडमध्ये जाहीर सभा घेत सरकारचा खरपूस समाचार घेत कोथरूडचे भाजपचे उमेदवार चंद्रकांत पाटीलांवर (Chandrakant Patil) टीकास्त्र सोडले. कोथरूडमध्ये चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देणं हा केवळ सत्तेचा माज आहे असे सांगत त्यांनी महायुतीला टोला लगावला. मनसेचे कोथरूडचे उमेदवार किशोर शिंदे यांच्या प्रचार सभेत राज ठाकरेंनी विरोधकांवर प्रहार केला.
कोथरूड विधानसभेच्या निवडणुकीत बाहेरचा उमेदवार जेव्हा कोथरुडकरांवर लादला जातो कारण तुम्हाला गृहीत धरलेलं असतं, मुळात चंद्रकांत पाटील कोल्हापूर सोडून कोथरूडमध्ये निवडणूक का लढवत आहेत? असा प्रश्न राज ठाकरे यांनी या प्रचारसभेत उपस्थित केला. ज्या महाराष्ट्राने देशाला पुरोगामी विचार दिला तिथे जातीचा पातीचा विचार रुजतोय हे धोक्याचं आहे, असेही ते म्हणाले.
हेदेखील वाचा- राज ठाकरे: एक म्हणतोय की 10 रुपयात जेवण देऊ तर दुसरा म्हणतोय 5 रुपयात, महाराष्ट्राला काय भीक लागली का?
सत्ता नसताना देखील माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी सरकारला लोकहिताचे निर्णय घ्यायला लावले. इतकंच काय नंतर तुमच्या मोबाईल केवळ हिंदी आणि इंग्रजी मध्ये येणा-या मेसेजसोबत मराठी भाषेतील मेसेज ऐकू येऊ लागले ते मनसेच्या दट्ट्यांमुळेच. त्यामुळे मतदासंघाचा उमेदवार हा कोणत्या जातीचा आहे हे न बघता तो तुमच्या हाकेला ओ देणारा असायला हवा असेही त्यांनी सांगितले.
तसेच या सभेत यांनी माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांच्या विधानाचा उल्लेख करत 'ज्यांच्या नोक-या आहेत त्यांच्याच नोक-या जाणार आहेत, मग नवीन नोक-या येणार कुठून?' असा सवाल करत नरेंद्र मोदी यांच्या निर्णयामुळे हे सर्व झाले अशी घणाघातील आरोपही त्यांनी केला.