BJP-MNS Alliance: चंद्रकांत पाटील आणि राज ठाकरे यांच्यात आज भेट; राजकीय वर्तुळात मनसे-भाजप युतीच्या चर्चा
BJP-MNS Alliance | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

शिवसना (Shiv Sena ) पक्षाशी असलेली युती तुटल्यानंतर भाजप नव्या मित्राच्या शोधात आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हे आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेत आहे. ही सदिच्छा भेट असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी आगोदरच स्पष्ट केले आहे. तरीही या भेटीकडे संभाव्य मनसे-भाजप युतीच्या (MNS-BJP Alliance) नजलेतूनच पाहिले जात आहे. मनसे-भाजप युतीबाबत या पूर्वी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले होते की, भाजपसारख्या राष्ट्रीय पक्षासोबत युती करायची तर मनसेला आपली प्रादेशिक भूमिका सोडावी लागेल. त्यांचे परप्रांतीयांबद्दल जे विचार आहेत त्याला दूर करावे लागेल. अन्यथा युती अशक्य असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते. त्यानंतर आजच्या भेटूतन काय पुढे येते याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

राज ठाकरे यांच्यासोबत होत असलेल्या भेटीबाबत बोलताना चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे की, मनसेचे इतर राज्यांबाबत आणि परप्रांतीयांबाबत असलेले विचार आम्हाला मान्य नाहीत. असे असले तरी राजकीय गाठीभेटी व्हायला हव्यात. या भेटीगाठी महत्त्वाच्या असतात म्हणूनच मी राज ठाकरे यांची भेट घेत आहे. चंद्रकांत पाटील आणि राज ठाकरे यांच्यातील आजची भेट म्हणजे मनसे भाजप युतीचे संकेत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. (हेही वाचा, BMC Election 2022: मुंबई महापालिका निवडणुकीत मनसे-भाजप युती होणार का? विरोधी पक्षनेत्याने दिले हे उत्तर)

चंद्रकांत पाटील आणि राज ठाकरे यांच्यात आज (शुक्रवार, 6 ऑगस्ट) सकाळी 11.30 वाजता भेट होणार आहे. या भेटीत काय चर्चा होते याकडे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. मनसेची परप्रांतीयांबद्दलची भूमिका बदलण्यात चंद्रकांत पाटील यशस्वी होणार का? की परप्रांतियांबाबतचा मुद्दा स्वीकारुन भाजप मनसेसोबत युती करणार याबाबत जोरदार उत्सुकता आहे.

दरम्यान, एका माध्यमसमूहाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना राज्याचे विरोधीपक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप आणि मनसे युती होण्याबाबत सकारात्मक संकेत दिले होते. हे संकेत देताना मराठी माणसावर अन्याय, अत्याचार होऊ नये ही बाब खरी आहे. परंतू, त्यासाठी इतरांवर अन्याय करायचा हे देखील योग्य नाही, असा टोलाही देवेंद्र फडणवीस यांनी लगावला होता.