
राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर विरोधातील लोक नव्या सरकारवर टीका करायला लागले आहेत. तर दुसऱ्या बाजूला माजी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामध्ये मंगळवारी एक गुप्त भेट झाली. या दोघांच्या भेटीत जवळजवळ एक तासभर तरी चर्चा झाल्याचे दिसून आले. यानंतर एका वेगळ्याच चर्चांना उधाण आले असून मनसे आणि भाजप युती करतील अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तर मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी मनसे आणि भाजप युती बाबत सूचक वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
राजू पाटील यांनी युतीबाबत अधिक स्पष्टीकरण देत असे म्हटले की, सभागृहाची सध्याची परिस्थिती आपण पाहतोच. पण भविष्यात मनसे आणि भाजप एकत्र येऊ शकतात. कारण सध्या राज्यात जे काही राजकरण सुरु आहे त्यावरुन तुम्हाला कळले असेलच. येत्या 23 जानेवारीला महाराष्ट्र नवनिर्माण सेना कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडणार आहे. या मेळाव्यात होणाऱ्या राज ठाकरे यांच्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. त्यामुळे 23 तारखेच्या मेळाव्यात राज ठाकरे या भेटीतील तपशीलव उघड करणार का? याबाबत उत्सुकता आहे.(मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यात गुप्त बैठक; महाराष्ट्रात नवे राजकीय समिकरणाची चर्चा)
दरम्यान, शिवसेना-भाजप युती ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावर झाली होती. मात्र, आता शिवसेनाच भाजपपासून दुरावल्याने भाजपला नवा मित्र हवा आहे. मनसेचा अलिकडील इतिहास पाहता मनसेने भाजप खास करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या विरोधी भूमिका घेतली आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांना एकत्र यायचे तर पुन्हा एकदा नवा मुद्दा हाती घ्यावा लागणार आहे. यात मनसेने जर हिंदुत्त्वाचा पुरस्कार केला तर ही युती आकाराला येण्याची शक्याता कैक पटींनी वाढू शकते. ही सर्व पार्श्वभूमी विचारात घेता दोन्ही नेत्यांची भेट कमालीची महत्त्वाची मानली जात आहे.