लोकसभा निवडणूक निकालाच्या एक दिवस आधी आज ( 3 जून) भाजपा कडून पदवीधर आणि शिक्षक मतदार संघासाठी (MLC Graduates and Teachers Constituency Elections) होणार्या महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणूकीसाठी उमेदवार यादी जाहीर करण्यात आली आहे. चार जागांसाठी होत असलेल्या या निवडणूकीत भाजपा (BJP) कडून 3 जणांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. लोकसभेसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिलेल्या मनसे विरूद्ध भाजपाने विधान परिषदेसाठी उमेदवार जाहीर केला आहे. कोकण पदवीधर मतदारसंघातून भाजपने विद्यमान विधानपरिषद आमदार निरंजन डावखरे (Niranjan Davkhare) यांना पुन्हा एकदा संधी दिली आहे. तर त्यांच्या विरूद्ध मनसे (MNS) कडून अभिजीत पानसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे ही लढत चुरशीची होणार आहे. भाजपा कडून मुंबई पदवीधर मतदारसंघातून किरण शेलार आणि मुंबई शिक्षक मतदारसंघातून शिवनाथ दराडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
विधानपरिषदेसाठी महायुती मधून एकी नसल्याचं चित्र आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस कडून देखील मुंबई शिक्षक मतदार संघासाठी शिवाजीराव नलावडे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यांच्याही विरोधात भाजपने शिवनाथ दराडेंना तिकीट दिलं आहे. (हेही वाचा, Vidhan Parishad Election: विधानपरिषदेच्या 4 जागांसाठी निवडणुकांचा कार्यक्रम आयोगाकडून जाहीर, 26 होणार जूनला मतदान).
महाराष्ट्र विधान परिषद निवडणूकांचा कसा असेल सामना?
मुंबई शिक्षक मतदार संघ - शिवनाथ दराडे (भाजप) विरुद्ध ज. मो. अभ्यंकर (ठाकरे गट) विरुद्ध शिवाजीराव नलावडे (अजित पवार गट)
मुंबई पदवीधर मतदार संघ - किरण शेलार (भाजप) विरुद्ध अनिल परब (ठाकरे गट)
कोकण पदवीधर मतदार संघ - निरंजन डावखरे (भाजप) विरुद्ध अभिजीत पानसे (मनसे)
विधानपरिषदे मध्ये मुंबई पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे विलास पोतनीस, कोकण पदवीधर मतदारसंघातून निरंजन डावखरे, मुंबई शिक्षकचे कपिल पाटील व नाशिक शिक्षकचे किशोर दराडे यांच्या सदस्यत्वाची मुदत 7 जुलै 2024 रोजी संपत आहे. त्यामुळे आता या चार जागांसाठी 26 जूनला मतदान होणार आहे, तर 1 जुलै रोजी मतमोजणी केली जाणार आहे. 7 जून अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे.